मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - latur saptrang

Breaking

Monday, February 28, 2022

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • मराठी भाषा गौरव आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहन

  • विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा, संस्थांचा गौरव

मुंबई, दि. २७- सुमारे दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मराठी भाषा गौरव वर्षभरच नव्हे तर आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते.या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रधान सचिव भूषण गगराणी यांचेसह साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते. राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. त्यांच्या कर्तृत्वाचा थोडा तरी अंश आपल्यात आला पाहिजे. आपल्या साधू-संतांनी आपल्याला दिलेला वारसा आपण पुढे कसा नेणार आहोत ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाची मातृभाषा ही त्याच्या आईकडून त्याला मिळालेली सर्वोत्तम देणगी असते. तिचा गौरव करणे आवश्यक आहे. शिवसेनेची सुरुवात झाली तेव्हा शिवसेना प्रमुखांनी मराठी भाषिकांना सांगितले होते नोकऱ्या मागणारे होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा असे सांगून व्यवसाय करण्याचे आवाहन मराठी युवकांना त्यांनी केले होते. मराठी भाषा यापुढे वर्षानुवर्षे टिकली पाहिजे याची जबाबदारी आपल्यावर आहे. घरा-घरांतून मराठी बोलली गेली पाहिजे असे सांगून इतर भाषा शिकाव्यात मात्र मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गौरवदिन हा भव्य स्वरुपात व्हावा

यापुढचा गौरवदिन हा मोठ्या पटांगणात व्हावा तो संपूर्ण राज्यभर साजरा व्हावा. जगभर मराठी माणसं पसरलेली आहेत. या ठिकाणी मराठी कुटुंब एकत्र येतात आणि मराठी भाषा गौरव दिन एखाद्या सणासारखा साजरा करतात. आज पाच गावात पुस्तकाचे गाव तयार होते आहे या साठी अभिनंदन करून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या वऱ्हाडी, मालवणी, अहिराणी या सारख्या भाषेतील   साहित्य ठेवले पाहिजे. जर आपल्या राज्यात कोणीतरी चरितार्थासाठी येत असेल तर त्याने इथे आपल्या भाषेत बोलले पाहिजे हा आग्रह केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठी भाषेची उपयोगिता वाढावी ती संपर्काची भाषा व्हावी यासाठी राज्यशासन विविध उपक्रम राबवित असून येत्या गुढीपाढव्याला मराठी भाषा भवन उभारणीस सुरुवात होणार आहे. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  मराठीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात दिली. नवी मुंबई येथे मराठी भाषा उपकेंद्रासाठी सिडकोने जागा निश्चित केली असून त्यासाठी 25 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. भिलार पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करण्यात येत असून टप्प्या-टप्प्याने राज्यभर असे पुस्तकांचे गाव तयार होणार आहेत, यासाठीही निधीची तरतूद केली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी पुर्ण व्हावी यासंदर्भातील घोषणा प्रधानमंत्री यांनी लवकर करावी अशी विनंती करुन मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी बहुजात आणि बहुज्ञात भाषा होणे आवश्यक आहे. विज्ञान, विधी, संगणक या विषयांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याची गरजही श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी भाषा गौरव दिन हा केवळ शासकीय स्तरावर न राहता  विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रित घेऊन मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी कार्य व्हावे. यासाठी ठोस कृतीकार्यक्रम करावा लागेल समाज म्हणून प्रत्येकाने यात सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठी ही केवळ ओठातून नव्हे तर ती पोटातून येणारी भाषा व्हावी. उद्योगाची भाषा मराठी असावी, कोणत्याही देशावर हल्ला करतांना आधी तिथल्या संस्कृतीवर आणि भाषेवर हल्ला केला जातो. इंग्रजी ही रोजगार देणारी भाषा आहे हा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. प्रत्येक दुकांनावर मराठी पाटी लावण्याचा निर्णय घेतला तर त्यास विरोध करणाऱ्यांना समज देण्याची गरज व्यक्त करुन. इथल्या मातीचे ऋण मान्य करुन मराठीचा अभिमान बाळगावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

मराठी जनतेच्या आग्रहाचा केंद्राने मान ठेवावा- मंत्री सुभाष देसाई

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत, भारत सरकारने मराठी लोकांच्या आग्रहाचा मान ठेवावा, अन्यथा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिला. श्री. देसाई पुढे म्हणाले की, मराठी गौरव दिनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, अशी सर्वांची अपेक्षा होती. सर्व प्रयत्न करण्यात आले. केंद्र सरकारने सकारात्मकता दाखविली, परंतु अद्याप त्याची घोषणा केली नाही. मागील दोन वर्षांपासून केंद्राकडे आणि पंतप्रधानांकडे पाठपुरावा करुन पत्रव्यवहार केला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची देखील भेट घेतली परंतु अद्याप त्याचा निर्णय होत नाही. सर्व महाराष्ट्राला या निर्णयाची प्रतिक्षा आहे,  यासाठी अभियान चालवले, लोकजागृती केली. महामहिम राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठवले. परंतु अद्याप केंद्राने ही घोषणा केली नाही, याबद्दल मंत्री श्री. देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

मागील वर्षी मराठी भाषा दिनी दोन सूचना केल्या होत्या. त्यातील पुस्तकांचे गाव ही योजना प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याची सूचना होती, त्यानुसार श्रीरामपूर, विदर्भातील नवेगाव, बुलढाणा, वेरूळ, सिंधुदुर्ग येथील पोंभुर्णे या पाच गावांमध्ये पुस्तकाचे गाव साकारेल तर उर्वरित जिल्ह्यात पुढे ही चळवळ सुरू होईल.  राज्य शासनात जे शब्द वापरले जातात, ते सुलभ करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती, ही दुसरी सूचना होती, त्यानुसार लवकरच सुलभ शब्दांचा कोश सादर करून राज्य व्यवहारात मराठीचा वापर केला जाईल, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.  मराठी भाषा विभागाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन पुरस्कारप्राप्त मान्यवर साहित्यिकांचे त्यांनी अभिनंदन केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आतापर्यत दीड लाख पत्र राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले असल्याचेही राज्यमंत्री डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.

विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा, संस्थांचा गौरव

ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तर डॉ. रमेश वरखेडे आणि मराठी अभ्यास परिषद, पुणे यांना अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार लोकवाड्ःमय गृह, मुंबई यांना तर मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार डॉ. चंद्रकांत पाटील आणि मराठी अभ्यास केंद्र मुंबई यांना प्रदान करण्यात आले. राज्य साहित्य संस्कृती मंडळाने यापूर्वी 36 पुरस्कारप्राप्त लेखकांना घरपोच पुरस्कार दिले आहेत. त्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. यावेळी 37 पुस्तकांचे पुन:प्रकाशन व लोकार्पण करण्यात आले.  चौरंग निर्मित ‘शारदेच्या अंगणी, मराठीच्या प्रांगणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

000

 



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/XeWvtd1
https://ift.tt/fC60bxV

No comments:

Post a Comment