खासगी शिकवण्या ऑफलाईन सुरु करण्यास परवानगीमराठवाडा पालक संघाच्या मागणीला यश
लातूर : खासगी शिकवणी वर्ग सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचे आकलन होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खासगी शिकवणी वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्याची मागणी मराठवाडा पालक संघाच्यावतीने पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मंगळवारी जिल्हाधिकार्यांनी आदेश काढून २ फेब्रुवारीपासून खासगी शिकवण्या ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यास परवानगी दिली असल्याचे सांगून मराठवाडा पालक संघाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी पालकमंत्री देशमुख यांचे आभार मानले आहेत.
गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोनामुळे शासनाने निर्बंध लादले. त्यातच अगोदरच व्यवसाय व रोजगार बंद व ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांशी पालकांना आपल्या पाल्यांना अँड्रॉईड मोबाईल विकत घेऊन देण्यासाठी उसनवारी करावी लागली. पालकांनी कसे तरी करून पाल्यांसाठी अँड्रॉईड मोबाईलची सोय करून दिली. मात्र, बहुतांशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे आकलन झाले नाही. काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला बगल देऊन मोबाईलवरील खेळांकडे वळले. दरम्यान, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरु केले. परंतु, गेल्या १० जानेवारीपासून कोरोनाच्या नावाखाली खासगी शिकवण्या बंद करुन ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पूर्वीप्रमाणेच शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय, लातुरात कोरोना रुग्णसंख्याही कमी होत आहे. आजची पिढी हे उद्याचे देशाचे भवितव्य असून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी खासगी शिकवण्या ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी मराठवाडा पालक संघाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, अध्यक्ष डॉ. भारत घोडके व अन्य पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल पालकमंत्री देशमुख यांनी घेत जिल्हाधिकार्यांना खासगी शिकवण्या ऑनलाइन सुरू करण्यास निर्देश दिले. त्यानूसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी २ फेब्रुवारीपासून खासगी शिकवण्या ५० टक्के क्षमतेनुसार व कोविड नियमानुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठवाडा पालक संघाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी पालकमंत्री देशमुख यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment