येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्यता नोंदणी अभियानास मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा - मंत्री छगन भुजबळ
नाशिक,येवला,दि.११ फेब्रुवारी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सभासद नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांनी येवला मतदारसंघात ५१ हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाचे विचार व ध्येय धोरणे पोहचवून सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
येवला मतदारसंघाचे निरीक्षक दिलीप खैरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ५१ हजार सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला संपर्क कार्यालयात या सभासद नोंदणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, हरिश्चंद्र भवर, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, दिपक लोणारी, जिल्हा नियोजन सदस्य ज्ञानेश्वर शेवाळे, दत्तात्रय डुकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, मकरंद सोनवणे, ज्ञानेश्वर दराडे,किसनराव धनगे, राजेश भांडगे,विश्वासराव आहेर,पांडुरंग राऊत,सचिन कळमकर, बबन शिंदे, शिवाजी सुपनर,संतोष खैरनार,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सभासद नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे ध्येय धोरणे तसेच सर्वसामान्य जनतेसाठी करण्यात आलेली विकासकामे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यात प्राधान्य द्यावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
ते म्हणाले की, शासनाने वाईन बाबत घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांना होणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अगोदर अडचणीत असून त्यांच्यासाठी शासनाचा हा निर्णय विशेषतः नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय फलदायी ठरणार आहे असे सांगत विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी यावेळी सांगितले.
हिजबाच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, शांततेने सत्याग्रह करण्याचा सर्वाना अधिकार आहे. माझी विनंती आहे शांततेने मत मांडा कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन करत शाळा कॉलेजे मध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्माचा विष पेरण्याचा काम करू नका असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाजकंटक व फूस लावणार्या नेत्यांना दिला. ते म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर गेलं पाहिजे. देशातील मोठ्या नेत्यांना माझी विनंती आहे की सर्वांना बरोबर घेऊन देशाला समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे. आता जर जाती धर्माच्या भिंती उभ्या केल्या तर ते मुलांमध्ये देशाच्या, घटनेच्या दृष्टीने अयोग्य आहे.पुन्हा एकदा विनंती आहे की, शांततेने आपलं मत मांडा. हे प्रकरण वाढू नका ,शिक्षणा वर लक्ष द्या, असे आवाहन त्यांनी सर्व धर्मीयांना केले.
No comments:
Post a Comment