आसोला मेंढा धरणाची उंची वाढविण्याच्या कामांना लवकरच मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील - latur saptrang

Breaking

Friday, February 11, 2022

आसोला मेंढा धरणाची उंची वाढविण्याच्या कामांना लवकरच मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 11 : आसोला मेंढा धरणाची उंची वाढविणे तसेच पर्यटन विकासासाठी जमीन देण्याबाबत लवकरच कार्यवाही  करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

मंत्रालयातील जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांच्या दालनात आसोला मेंढा धरणाची उंची वाढविणे तसेच आसोला मेंढा प्रकल्पातील ५ हेक्टर जमीन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी  देण्याबाबत झालेल्या बैठकीत श्री. पाटील बोलत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, लघु पाटबंधारेचे उपसचिव अमोल फुंदे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री.देवगडे उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, आसोला मेंढा धरणाची उंची वाढविणे व त्यानुषंगिक कामे  करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनीचे संपादन करून कामे प्राधान्याने पूर्ण व्हावेत यासाठी शासन सकारात्मक आहे. याबाबतीत प्राप्त प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. आसोला मेंढा प्रकल्पातील ५ हेक्टर जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास देण्याबाबतही  लवकरच कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी दिले.

आसोला मेंढा धरणाची उंची वाढविण्याचे काम विहित वेळेतच व्हावे – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, आसोला मेंढा धरणाची उंची वाढविल्यास सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होवून येथील शेतीचे सिंचन देखील वाढण्यास मदत होणार आहे. याबाबत कार्यवाही गतीने होणे गरजेचे आहे. या कामाचा कालावधी वाढल्यास प्रकल्पाची किंमत वाढून हे काम पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे हे काम विहित वेळेत व्हावे. तसेच आसोला मेंढा प्रकल्पातील ५ हेक्टर जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास देण्याबाबतही काम लवकरात लवकर  व्हावे, असे पालकमंत्री श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/v0hDpVG
https://ift.tt/t4nY2pl

No comments:

Post a Comment