राज्यात जानेवारीमध्ये ७ हजार ७१३ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती - latur saptrang

Breaking

Friday, February 11, 2022

राज्यात जानेवारीमध्ये ७ हजार ७१३ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. 11 : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी 2022 मध्ये 7 हजार 713 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.

अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 2021 मध्ये राज्यात 2 लाख 19 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी 2020 मध्ये 1 लाख 99 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://ift.tt/ChzOGwu हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 94 हजार 345 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

श्री. मलिक म्हणाले की, माहे जानेवारी 2022 मध्ये विभागाकडे 25 हजार 981 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 5 हजार 888, नाशिक विभागात 5 हजार 152, पुणे विभागात 6 हजार 556, औरंगाबाद विभागात 4 हजार 711, अमरावती विभागात 1 हजार 540 तर नागपूर विभागात 2 हजार 134 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे जानेवारीमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 7 हजार 713 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 2 हजार 847, नाशिक विभागात 2 हजार 795, पुणे विभागात 535, औरंगाबाद विभागात 1 हजार 285, अमरावती विभागात 213 तर नागपूर विभागात 38 बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

नोकरी इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://ift.tt/ChzOGwu या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन श्री. मलिक यांनी केले आहे.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/umOIT98
https://ift.tt/t4nY2pl

No comments:

Post a Comment