मुंबई, दि. 16 :- ज्येष्ठ संगीतकार, गायक बप्पी लहरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा लाभलेला, भारतीय चित्रपटांना ‘डिस्को’ संगीताची ओळख करुन देणारा, उडत्या चालीच्या गाण्यांनी तरुणाईला मंत्रमुग्ध करणारा, चार दशकांहून अधिक काळ चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा लोकप्रिय कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतीय चित्रपट व संगीत रसिकांना त्यांची उणीव जाणवत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शास्त्रीय संगीताचा कौटुंबिक वारसा लाभलेल्या बप्पी लहरींचं संपूर्ण जीवन संगीतमय होतं. नया कदम, वारदात, डिस्को डांसर, हथकड़ी, नमक हलाल, मास्टरजी, डांस डांस, हिम्मतवाला, जस्टिस चौधरी, तोहफा, मकसद, सैलाब, द डर्टी पिक्चर सारख्या चित्रपटांच्या यशात बप्पी लहरींच्या संगीताचं मोठं योगदान आहे. बप्पी लहरींनी गायलेली गाणी आणि दिलेल्या संगीतांनं तरुण पिढीला कायम मनमुराद आनंद दिला. त्यांचं संगीत हा भारतीय चित्रपटविश्वाचा अमूल्य ठेवा आहे. त्यांचं निधन ही भारतीय चित्रपट व संगीत क्षेत्राची मोठी हानी आहे. बप्पी लहरींची गाणी, त्यांचं संगीत, ‘सोनेरी’ अस्तित्व कायम चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्मरण करुन श्रद्धांजली वाहिली.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ArFvpPu
https://ift.tt/Ujxtz3f
No comments:
Post a Comment