पंडीत दादासाहेब भातंबरेकर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय - पालकमंत्री छगन भुजबळ
*नाशिकच्या सहजीवन कॉलनी गेट नं २ मार्गाचे संगीत भूषण पं. दादासाहेब भातंबरेकर मार्ग म्हणून नामकरण*
संगीत भूषण पं. दादासाहेब भातंबरेकर म्हणजे संगीत क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तीमत्व असून त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असून महानगरपालिकेने त्यांचे नाव येथील मार्गाला देऊन अतिशय महत्वपूर्ण काम केले असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आज शहरातील वीसे मळा, कॉलेज रोड येथील नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक २ मधील सहजीवन कॉलनी गेट नं २ मार्गाचे संगीत भूषण पंडीत दादासाहेब भातंबरेकर मार्गाचा नामकरण कार्यक्रम पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर सतिष कुलकर्णी, आमदार प्रा.देवयानी फरांदे, डॉ.एम.एस.गोसावी, माजी आमदार हेमंत टकले, जयंतराव जाधव, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, शैलेश कुटे, नगसेवक जॉय कांबळे, शाहु खैरे, शिवाजी गांगुर्डे, जेष्ठ संगीतकार डॉ.अविराज तायडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पं. दादासाहेब भातंबरेकर हे सुप्रसिद्ध किराणा घराण्याचे गायक सन्माननीय श्री.गोपाळराव भातंबरेकर यांचे ते सुपुत्र तर श्री.गोविंदराव भातंबरेकर यांचे पुतणे होते. या थोर आणि संपन्न घराण्यांचा वारसा दादासाहेब भातंबरेकर यांनी तेवढ्यात ताकदीने पुढे नेला. पंडित बालगंधर्व, पंडित भीमसेन जोशी, सुप्रसिद्ध गायिका श्रीमती माणिक वर्मा यांसारख्या अनेक कलाकारांना त्यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली. नाशिकच्या लोकहितवादी मंडळातर्फे होणाऱ्या गायन स्पर्धाच्या माध्यमातून अनेक कलाकार घडवले. २५ वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी या संगीत स्पर्धांमध्ये आपल्या वादनानी आणि कौशल्यानी रंगत आणली.
काळाच्या बदलत्या स्वरूपानुसार संगीत वाद्यात त्यांनी तांत्रिक प्रगतीचा वापर करून वीजेवर आणि सहा व्होल्टच्या बॅटरीवर चालणारा, स्वयंचलित तानपुरा बनवला आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांची वाहवा मिळवली. स्वभावाने अत्यंत मृदुभाषी-मितभाषी असे श्री दादासाहेब भातंबरेकर म्हणजे संगीत क्षेत्रातील एक मानबिंदूच आहेत अशी पं. दादासाहेब भातंबरेकर यांची ओळख पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज उपस्थितांनी करून दिली.
यावेळी माजी आमदार हेमंत टकले, डॉ.एम.एस गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शने प्रा. जयंत भातंबरेकर यांनी केले.
No comments:
Post a Comment