लातूर/प्रतिनिधी* - पर्यावरण अभ्यासक तथा बांबू लागवड चळवळीचे प्रणेते पाशा पटेल राबवित असलेल्या बांबू लागवड या पर्यावरणपूरक चळवळीची दखल केंद्र सरकारनेही घेतली असून, या क्षेत्रातील त्यांची तळमळ पाहता, फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून लोदगा येथे उभारण्यात आलेल्या बांबू रोप निर्मितीची टिशू कल्चर प्रयोगशाळा, बांबूपासून टूथब्रश निर्मितीचा कारखाना आणि इतर महत्त्वपूर्ण योजनांचे लोकार्पण करण्यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे दि. 10 एप्रिल रोजी येत आहेत. याप्रसंगी बांबूशी निगडीत विविध घटकांचे शहा यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले जाणार आहे.
एका वर्षाला 1 कोटी बांबूची रोपे अत्याधुनिक ऑटोमॉईझ पद्धतीने तयार करणाऱ्या टिशू कल्चर प्रयोगशाळा, जगातील सीएनसी मशीन वापरून तयार करण्यात येणाऱ्या बांबूपासून फर्निचर बनविण्याचा कारखाना, बांबूपासून टूथब्रश निर्मिती कारखान्याचे लोकार्पण तसेच अटल बांबू डिप्लोमा इंजीनियरिंग कॉलेजचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.बांबूपासून इथेनॉल निर्मितीचा पहिला बायो रिफायनरी प्रकल्प असामधील नुमालिगड येथे ऑगस्ट 2022 मध्ये सुरू होत असून, या रिफायनरीचे सीएमडी भास्कर फुकान हे या प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. नागार्जुना ग्रुपने विकसित केलेल्या बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या भारतीय प्रणालीचे सादरीकरण डॉ. पंड्या हे करणार आहेत. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ डेहराडूनचे डॉ. अजय ठाकूर हे बांबूच्या रोपाच्या अत्याधुनिक निर्मितीचे सादरीकरण करतील. एनबार येथील संस्था जगातल्या 48 देशात बांबू संशोधनाचे कार्य करते. इनबारचे मुख्यालय असलेल्या बीजिंग येथील कार्यालयाचे प्रमुख जे. दुराई हे आपले संशोधन सादर करतील. युरोपियन युनियनच्यावतीने जगभरात बांबूचे संशोधन केले जात आहे, त्या युनियनचे प्रमुख मुकेश गुलाटी हे जगभरातील संशोधनाबद्दल आपले अनुभव कथन करणार आहेत. अमेरिकेच्या अंतराळ संशोधनातील मुख्य संस्था नासाचे दोन शास्त्रज्ञ मदनी आणि पुरोहित हे महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या पुनरुज्जीवनाच्या मोहिमेबाबतचे सादरीकरण कोलोफॉर्नियातून करणार आहे. बांबूपासून फर्निचर निर्मितीचे सादरीकरण कॉनबॅक संस्थेचे संजीव करपे करतील. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबादचे प्रवीणसिंग सोळंकी हे बांबू डिझाईनवर आपले सादरीकरण करतील. एनटीपीसी आणि महावितरण दगडी कोळसाबरोबरच वीजनिर्मिती प्रकल्पात इंधन म्हणून बांबूचा वापर करणार आहे, त्याचे सादरीकरणही यावेळी अधिकारी अमित शहा यांच्यासमोर करणार आहेत. बांबूशी निगडीत असलेल्या अनेक योजनांचे सादरीकरण बांबू बोर्ड महाराष्ट्राच्यावतीने यावेळी केले जाणार असल्याची माहिती पाशा पटेल यांनी दिली.
एकूणच जगाला वाचवायचे असेल तर बांबूची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबतची जगभरातील वस्तुस्थिती पाशा पटेल हे अमित शहा यांच्यासमोर मांडणार आहेत. याशिवाय बांबूपासून इंधन, ऊर्जानिर्मिती, इथेनॉल निर्मिती, ग्लोबल वार्मिंग या सर्व विषयावर पाशा पटेल हे अमित शहा यांच्याशी सखोल चर्चा करणार असून, देशाचे धोरण बांबूच्या माध्यमातून पुढे नेता येईल का, यावर उभयतांमध्ये विचारमंथन होणार आहे.
नदी झांकी तो जल राखी' या उक्तीनुसार नदीकाठी बांबू लागवडीतून नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची महत्वाकांक्षी चळवळ पाशा पटेल यांनी हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत महाराष्ट्रातील 25 पैकी 9 नऊ जिल्ह्यात कार्यशाळांमधून त्यांची व्याख्याने झाली आहेत. उर्वरित विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात होणाऱ्या कार्यशाळांमध्ये अमित शहा यांच्या लोदगा येथील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात आहे.
No comments:
Post a Comment