क्रीडा गुणांसाठी 31 मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावेत - latur saptrang

Breaking

Monday, March 14, 2022

क्रीडा गुणांसाठी 31 मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 क्रीडा गुणांसाठी 31 मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावेत


 


हिंगोली, दि. 14 (जिमाका) :  सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत जिल्हा क्रीडा  अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता, हिंगोली येथे दि. 15 मार्च, 2022 ते 31 मार्च, 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.


माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) परिक्षेस प्रविष्ठ खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व आठवी मध्ये सदर विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय सहभाग व प्राविण्य जे असेल त्यातील सर्वोच्च कामगिरीचे मूळ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.


उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) मध्ये प्रविष्ठ खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 9 वी व 10 वीमध्ये क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. परंतु सदर खेळाडूस इयत्ता 10 वी मध्ये सदर प्रमाणपत्रावर क्रीडा सवलत गुण घेतले असल्यास यावर्षी तो क्रीडा सवलत गुण घेण्यास पात्र  असणार नाही.


प्रस्तावासोबत इयत्ता 10 वी, 12 वी चे परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेले खेळाचे प्राविण्य, सहभाग पत्र, क्रीडा सवलत गुण अर्ज विहित नमुना (प्रपत्र 1,2,3), इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सोबत 10 वीच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडावीत.


एकविध खेळ संघटना क्रीडा संचालनालयाने मान्यता दिलेल्या राज्यस्तर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग व प्राविण्य खेळाडूच सवलत गुणास पात्र राहतील. 

No comments:

Post a Comment