विधानपरिषद प्रश्नोत्तरे - latur saptrang

Breaking

Thursday, March 10, 2022

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना महिन्याभरात लाभ मिळणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई,‍ दि. 10 : मालेगाव (जि. नाशिक) तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जे शेतकरी पात्र असूनही त्यांना पैसे मिळाले नाही. एनडीआरएफच्या निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत मदत केली जाईल, अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सर्वश्री अमोल मिटकरी, डॉ.रणजित पाटील यांनी मालेगाव (जि. नाशिक) तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.वडेट्टीवार बोलत होते.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, या प्रकरणी नुकसान न होता काही प्रस्ताव आले होते. याबाबत तलाठी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत पंचनामे होऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे येतात. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याला पैसे मिळाले नाही. व काही शेतकऱ्यांना नुकसान झाले नसतानाही पैसे मिळाले अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ही गंभीर बाब आहे.

या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अंतीम अहवाल आल्यानंतर देय असलेल्या बाधित शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत मदत देण्यात येईल. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून याबाबत अधिक तपासणी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही श्री.वडेट्टीवार यावेळी सांगितले.

००००

कोकणातील आपत्तीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 10 : कोकणात सातत्याने येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला असून येत्या 4 वर्षात साधारणत: एकूण 3200 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. याकरिता दि. 23 सप्टेंबर 2021 च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य शासनाकडून 1200 कोटी रूपये तर 15 व्या वित्त आयोगाकडून 2000 कोटी रूपये सहभाग असणार आहे. याद्वारे समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे, भूमिगत विद्युत वाहिन्या, चक्रीवादळ केंद्रे, निवारा केंद्रे बांधणी आदींचे नियोजन असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यात समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून 1400 कोटी रूपयांचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून येत्या 15 दिवसात त्यास परवानगी देण्यात येईल. प्रस्ताव मंजुरीनंतर त्यासंदर्भातील निविदा काढून पुढील 2-3 महिन्यात कामाची सुरूवात करण्यात येईल, असे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री विजय उर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, अनिकेत तटकरे, प्रसाद लाड, विनायक मेटे, रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केला होता.

000

धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ लागू – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 10 : धनगर समाजाला आरक्षण मिळावे तसेच ते कायद्याच्या कसोटीवर टिकावे याबाबतचे काम ‘टीस’ या सामाजिक संस्थेला देण्यात आले होते.  या संस्थेने आपला अहवाल सादर केला आहे.  धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या निकषावर महाधिवक्ता यांचे अभिमत घेऊन आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या एस.टी.च्या योजनांचा लाभ लागू असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

धनगर समाजाच्या विकासासाठी 22 योजना राबविण्यासाठी 100 कोटी रूपये एवढा निधी घोषित करण्यात आला असून 85 कोटी 3 हजार रुपयांची इतर तरतूद करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्यासंबंधी 5500 इतक्या विद्यार्थी संख्येस या शैक्षणिक वर्षात मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या बांधवांना 10 हजार घरे बांधून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री सदाशिव खोत, प्रविण दरेकर, महादेव जानकर, गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता.

000

बोधीवृक्ष शिक्षण संस्थेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास मान्यता रद्द – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 10 : सामजिक न्याय विभागाच्या दि. 29 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयान्वये कायम विनाअनुदानित म्हणून 8 शाळांना मान्यता देण्यात आली होती. या 8 शाळांमध्ये बोधीवृक्ष शिक्षण व बहुउद्देशीय शाळाचाही समावेश होता. बोधीवृक्ष शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळानी ठराव करून ही शाळा कै.बाजीराव पाटील वाचनालय या संस्थेला हस्तांतर व स्थलांतरणाची प्रक्रिया केली. या बाबतीत काही लेखी तक्रार प्राप्त झाल्यास किंवा काही चुकीचे झाले असेल तर त्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री डॉ.परिणय फुके यांनी उपस्थित केला होता.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/FQgqV6S
https://ift.tt/dbUgYhv

No comments:

Post a Comment