लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा गावोगावी जागर - latur saptrang

Breaking

Thursday, March 10, 2022

लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा गावोगावी जागर



 हिंगोली, दि. 10 (जिमाका) : गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा गावोगावी जागर करण्यास सुरुवात झाली आहे.


जयभवानी कला मंडळाचे नारायण घोंगडे यांनी  गोंधळाच्या माध्यमातून रात्री वसमत तालुक्यातील पारवा येथे व आज टेंभूर्णी येथे मनोरंजनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. संत गजानन महाराज लोककला व पथनाट्य मंडळाचे नामदेव कल्याणकर यांच्या पथकानेही रात्री हिंगोली तालुक्यातील राहुली बु. येथे व आज राहोली खु. , घोटा व नरसी नामदेव येथे लोककलेच्या माध्यमातून मनोरंजन करत शासनाच्या विविध योजनांची, उपक्रमांची जनजागृती केली. तर सूर्यप्रकाश बहुउद्देशीय सेवा संस्थेचे कलापथक प्रमुख शाहीर प्रकाश दांडेकर यांनी शाहिरीच्या माध्यमातून येहळेगाव साळुंके, पर्डी, औंढा नागनाथ, सुरगाव येथे शासनाच्या योजनांची, उपक्रमांची जनजागृती करण्यात आली. या कलापथकांच्या कार्यक्रमाला गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


वरील कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना साध्या आणि सोप्या भाषेत लोकगीते, भारुडे, गवळणी, बतावणी या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविणे हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्यामुळे जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्याकडून या कलापथकांचा जागर 17 मार्च पर्यंत सुरु आहे. 

No comments:

Post a Comment