स्त्री चळवळीला मार्गदर्शक ग्रंथ 'ज्ञानयोगिनी अक्कमहादेवी'
- डॉ.राजशेखर सोलापुरे
लातूर- बाराव्या शतकात स्त्रीमुक्तीची चळवळ महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वाखाली अनुभव मंटपातून सर्वप्रथम सुरू झाली. महिलांच्या उन्नतीचा आणि त्यांच्या अधिकाराचा उदघोष अक्कमहादेवी यांनी मध्ययुगात केला. स्वातंत्र्य आणि समतेचा विचार मांडत असताना ज्ञानयोगाचा मार्ग अनुसरणाऱ्या अक्कमहादेवी भारतातील स्त्री चळवळीच्या आद्य निर्मात्या आहेत. अक्कमहादेवीचे समग्र जीवनदर्शन आणि विचारदर्शन 'ज्ञानयोगिनी अक्कमहादेवी' या पुस्तकातून होते, त्यामुळे हे पुस्तक आजच्या स्त्री चळवळीला दस्तावेजाच्या स्वरूपात मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम लेखक व वक्ते डॉ.राजशेखर सोलापुरे यांनी केले.
डॉ.प्रभा वाडकर लिखित ज्ञानयोगिनी अक्कमहादेवी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वीरशैव भवन येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी ते भाष्यकार म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कुमुदिनी भार्गव, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रतिभाताई पाटील कव्हेकर, नगरसेविका रागिनी यादव यांची उपस्थिती होती. तर उमाकांत कोरे, राजकुमार कत्ते, बालाजी पिंपळे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले की, संत साहित्यात निर्माण झालेला विद्रोह हा बाराव्या शतकातील अक्कमहादेवी यांच्या वचनातील विद्रोह आहे.चर्चेचे आणि श्रद्धेचे स्वातंत्र्य मागणाऱ्या अक्कमहादेवीनी स्त्रीच्या शरीराप्रति आणि वेशभूषेप्रती असणाऱ्या समाजाच्या कलुषित दृष्टिकोनाला संपुष्टात आणण्यासाठी प्रसंगी वस्त्राचा त्याग केला. ही कृती तत्कालीन आणि आजच्या समाजातही क्रांतिकारक कृती ठरते. डॉ.प्रभा वाडकर यांनी आपल्या ज्ञानयोगिनी अक्कमहादेवी या पुस्तकातून हाच समग्र विद्रोह समर्थपणे मांडला आहे, त्यामुळे हे पुस्तक स्त्रीवादी चळवळीला अधिक शक्ती प्रदान करते. महिलांचे सबलीकरण होण्याऐवजी समबलीकरण झाले पाहिजे याचा पुरस्कार करणारा अक्कमहादेवीचा विचार सामाजिक आचार बनला पाहिजे,असे मत त्यांनी व्यक्त केले.
कुमुदिनी भार्गव म्हणाल्या की, महाराष्ट्रात अक्कमहादेवीचे चरित्र खूप लोकांना माहित नाही. त्याची माहिती या पुस्तकाच्या निमित्ताने आज झाली आहे,ही गोष्ट पुढील काळासाठी महत्त्वाची आहे. प्रतिभाताई पाटील कव्हेकर म्हणाल्या की, बाराव्या शतकात अक्कामहादेवीने केलेले कार्य आजच्या महिलांनी समजून घेतले पाहिजे आणि तो विचार प्रसारित केला पाहिजे. वाडकर यांचे पुस्तक सर्वांना समजेल अशा भाषेत असल्याने ते सर्वसामान्यांना कळणारे आहे.
अध्यक्षीय समारोप करताना माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले की, अध्यात्मिक क्षेत्रात स्त्री ही धोंड असते असे जे मानले जात होते त्याला अक्कमहादेवीने नकार दिला, उलट पुरुष हाच अध्यात्मिक क्षेत्रात अडचण असतो,असे अक्कमहादेवीचे मत होते.आज महिलांना पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही ते मिळाले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.समाजात वाचनसंस्कृती वाढली पाहिजे.ती वाढविण्यासाठी या पुस्तकाची मदत होईल.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेश विभुते यांनी केले.पुस्तक निर्मितीच्या पाठीमागील भूमिका लेखिका डॉ.प्रभा वाडकर यांनी मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.रजनी गिरवलकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ. उमा कडगे यांनी केले. याप्रसंगी वेगवेगळ्या संघटनेचे प्रमुख आणि चळवळीतील मान्यवर श्रोते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment