रोहीत पवारांनी शेतकरी हितासाठी केलेल्या मागणीला यश; कुकडीचे आवर्तन सोडण्यास जलसंपदामंत्र्यांचा हिरवा कंदील
कर्जत | कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी प्रकल्पातून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आवर्तन सोडण्यात यावे यासाठी आमदार रोहित पवार सतत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत होते. त्यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर शेतकरी व अधिकारी यांना विश्वासात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन झाले व शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी पाणीदेखील मिळत आहे. अशातच मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकाला तातडीने पाण्याची गरज असल्याचं लक्षात आल्यानंतर कुकडीचे आवर्तन 18 मार्चच्या दरम्यान सोडण्यात यावे, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्याकडे केली. जलसंपदा मंत्र्यांनीही आमदार रोहित पवार यांच्या मागणीला तातडीने हिरवा कंदील दाखवला.
कुकडीच्या या आवर्तनाचा फायदा हा कर्जत तालुक्यातील 54 गावांसह कुकडीवर अवलंबून असणाऱ्या सर्वच तालुक्यातील उभ्या पिकांना, जनावरांना, चारापिकांना व पिण्यासाठी होणार आहे. यापूर्वीचे आवर्तन सोडण्यापूर्वी गेट दुरुस्तीसह इतरही देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. रोहित पवार हे आमदार झाल्यानंतर त्यांनी कुकडीच्या प्रश्नाकडे वैयक्तिकरित्या विशेष लक्ष घातलं आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ते वेळोवेळी शासन स्तरावर मंत्री तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत असतात. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी पाणी मिळणार असल्याने त्यांच्यामध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment