मुंबई, दि. 7 : उस्मानाबाद येथे 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या क्षमतेच्या रूग्णालयासाठी जागा निश्चितीकरण करून आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण यांच्यात सामंजस्य करार करावा. संबंधित अहवाल पुढील आठ दिवसात सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
विधानभवन येथे सिंधूदुर्ग व उस्मानाबाद महाविद्यालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबाद येथील महाविद्यालय व रूग्णालयास मान्यता असून, पुढील कार्यवाहीस गती दिल्यास नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मृद व जलसंधारण तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार विनायक राऊत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), खासदार ओमराजे निंबाळकर, दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, राणा जगजित सिंह पाटील, कैलास पाटील, ज्ञानराज चौघुले, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले, उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयासंदर्भातील कामांना गती द्यावी. जागा निश्चितीकरण करून बांधकामाचे अंदाजपत्रक सादर करावे. तसेच, सामंजस्य करारासंदर्भातील अटींची पूर्तता करण्यात यावी. यासंदर्भातील पदभरती करण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे सांगत उस्मानाबाद येथील कामांचा आढावा मंत्री श्री देशमुख यांनी घेतला.
सिंधुदूर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचाही श्री.देशमुख यांनी आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील सहा महिन्यात नियमानुसार प्रथम व द्वितीय वर्षासाठी इमारतीचे तातडीने बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम देण्यात यावे. अधिष्ठाता यांची नियमित नियुक्ती करण्यात येईल. निधीची पूर्तता करण्यात येणार असल्याचेही मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/rTVd1wu
https://ift.tt/UmL9CyN
No comments:
Post a Comment