मंत्री छगन भुजबळ व माजी न्यायमूर्ती दिलीपराव भोसले यांच्या हस्ते अतिक्रमण कायदा आणि उपाय या पुस्तकाचे प्रकाशन
देशाचे ऐक्य टिकविण्याची जबाबदारी न्याय व्यवस्थेची - मंत्री छगन भुजबळ
नाशिक,निफाड,दि.६ मार्च :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने देशाला एकसंघ बांधून ठेवले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी भारताचे संविधान अतिशय महत्वाचे ठरले आहे. या कायद्याचा गैरफायदा घेतला गेला तर लोकशाही व्यवस्थेला हे घातक ठरेल. त्यामुळे संपुर्ण देशाचे ऐक्य टिकविण्याची जबाबदारी न्याय व्यवस्थेची असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महाराष्ट्र गोवा वकील परिषद व निफाड वकील संघ आयोजित कार्यशाळा व अतिक्रमण कायदा आणि उपाय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा निफाड येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीपराव भोसले, आमदार दिलीप बनकर, महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष वसंत साळुंखे,माजी अध्यक्ष ऍड.सुधाकर आव्हाड, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे जयंत जायभावे, माजी अध्यक्ष गजानन चव्हाण, उपाध्यक्ष ऍड.सुदीप पासबोला, उपाध्यक्ष राजेंद्र उमप, ऍड.नितीन ठाकरे, ऍड.भगीरथ शिंदे, ऍड.अविनाश भिडे, ऍड.अंबादास आवारे, ऍड.इंद्रभान रायते, ऍड.शरद नवले, निफाडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र कुंदे, यांच्यासह मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,निफाड वकील संघ अतिशय जागरूक राहून काम करताय ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. वकील संघाच्या या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की न्यायालयांची संख्या कमी असल्याने न्याय मिळण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे न्यायालयांची संख्या अधिक वाढावी त्यातून गोर गरिबांना न्याय मिळण्यास अधिक मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऍड.इंद्रभान रायते यांच्या अतिक्रमण कायदा आणि उपाय या पुस्तकाचा धागा पकडत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राजकारण्यांनी राजकारण्यांचे आणि कोर्टाने कोर्टाचे काम करण्याची आवश्यकता आहे. कुणीही कुणाच्या क्षेत्रात अतिक्रमण करता कामा नये. कारण सद्याच्या परिस्थितीत कोर्टावर कुणाचा दबाव आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या विश्वासाला तडा जातो. अन्याय झालेल्याना न्याय मिळण्यासाठी कायद्याचा वापर व्हावा. कायद्याचा गैरवापर होऊ नये. देशाला एकसंघ ठेवण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी निफडचे ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. इंद्रभान रायते लिखित अतिक्रमण कायदा व उपाय या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री छगन भुजबळ व माजी न्यायमूर्ती दिलीपराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निफाड वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अंबादास आवारे यांनी केले.
No comments:
Post a Comment