पाणीपुरवठा योजनेपासून कोणीही उपेक्षित राहू नये
आमदार धिरज देशमुख यांची सूचना; रेणापूर मध्यम प्रकल्प कालवा
लातूर : रेणापूर नगरपंचायत अंतर्गत येणारी गावे, विशेषत: तांडे, वाडा-वस्ती पाणीपुरवठा योजनेपासून उपेक्षित राहणार नाही, याची काळजी घ्या. सर्वांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न करा. टँकर, पाणी अधिग्रहण अशा पर्यायांचा वापर करण्याची वेळ येऊ नये, अशा सूचना लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केल्या.
लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे उन्हाळी हंगाम नियोजनासंदर्भात रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समिती बैठक आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. 19) झाली. लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, कार्यकारी अभियंता रो. सु. जगताप, उपविभागीय अधिकारी एस. एन. मोरे, तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, एस. एस. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, नगरपंचायत क्षेत्रातील आणि हद्दवाढीत आलेली सर्व गावे, तांडा-वस्ती व प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचले पाहिजे. प्रशासनाने आपसात समन्वय ठेवून प्रत्येक गाव, तांडा व तेथील प्रत्येक घराची नोंद या पाणीपुरवठा योजनेत घ्यावी. पाणीपुरवठा योजनेपासून कोणीही उपेक्षित राहू नये, याकडे लक्ष द्यावे.
सिंचन, बिगर सिंचनाची चालू व मागील पाणीपट्टी याची वर्गवारी करुन पाणीपट्टी वसुलीत सुधारणा करावी. चालू थकबाकी राहणार नाही, यासाठी व्यवस्था करावी. मागील थकबाकीसाठी सवलत द्यावी. थकबाकीदारांना असे पर्याय दिल्यास पाणीपट्टी थकीत राहणार नाही, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले. रेणापूर मध्यम प्रकल्पाचे व्यवस्थापन चांगले होण्याकरिता शासनाकडून मंजूर पदे टप्प्याटप्प्याने भरुन घ्यावे. आस्थापना मंजूर करुन कालवा निरीक्षक, दप्तर कारकुन सारख्या पदांचा अनुशेष प्राधान्याने भरुन काढावा, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment