सोलापूर,दि.4 (जिमाका) : सध्याचे युग हे धावपळीचे आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी प्राचीन काळापासून खेळाला महत्त्व आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळाला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आयोजित बहुविध उपयोगी आंतरगृह क्रिडा सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डॉ. सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीष बैजल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नवीन असले तरी उपक्रमशील आहे. शासनासह स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन निधीची उभारणी करावी. या निधीतून खेळाची अत्याधुनिक साधने घ्यावीत, जेणेकरून विद्यार्थांना इतर ठिकाणी जावे लागू नये. शिक्षण घेत असताना जेवढा अभ्यास आवश्यक आहे, तेवढेच खेळही आवश्यक आहेत. या क्रीडा सभागृहाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन राष्ट्रीय, ऑलिंपिकसारख्या स्पर्धा प्रकारात चांगले यश मिळवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विद्यापीठ चांगली प्रगती करत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
प्रास्ताविकात कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या अभियानातून 100 एकर परिसरात साकारणारे बहुविध उपयोगी आंतरगृह क्रिडा सभागृह हे महाराष्ट्रातील एकमेव सभागृह होत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून साडेचार कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या बहुउद्देशीय क्रीडा सभागृहात विविध 17 प्रकारच्या इनडोअर खेळांचा समावेश आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाच्या सरावासाठी आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहणार नाही. बहुउद्देशीय क्रीडा सभागृह पदवीदान समारंभासाठीही उपयुक्त असा बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार प्रा. श्रुती देवळे यांनी मानले. ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व विद्यार्थी, नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले होते.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/7ClsmaQ
https://ift.tt/93dFxEK
No comments:
Post a Comment