मुंबई, दि. 3 : महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दि. 6 ते 10 मार्च 2022 या पाच दिवसाच्या कालावधीत पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येणाऱ्या महिला अतिथींना आणि त्यांच्या परिवारास पर्यटक निवास कक्ष आरक्षणावर 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.
दरवर्षी 8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रामार्फत 2022 च्या जागतिक महिला दिनाचे बोधवाक्य (थीम) ‘आजची लैंगिक समानता, उद्याची शाश्वती’ (‘Gender Equality Today for The Sustainable Tomorrow’) हे ठेवण्यात आले आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये खंबीरपणे अग्रेसर असणाऱ्या महिलांना अधिक सक्षम करण्याकरिता तसेच त्यांच्याप्रती असलेला आदर, सन्मान व्यक्त करण्याकरिता एमटीडीसी प्रयत्नशील आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन सचिव वल्सा नायर तसेच एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज यांच्या संकल्पनेतून महिलांसाठीची ही सवलत योजना राबविण्यात येत आहे.
राज्यात एमटीडीसीची 30 हून अधिक पर्यटक निवासे आणि उपहारगृहे असून यामध्ये एक हजारपेक्षा अधिक निवास कक्ष आहेत. ही सवलत केवळ रविवार दि. 6 मार्च ते गुरूवार 10 मार्च 2022 या कालावधीकरिताच देण्यात आलेली असून केवळ पर्यटक निवास कक्षाच्या आरक्षणावर असणार आहे. पर्यटक निवास आरक्षणासाठी महिला अतिथींना 50 टक्के आरक्षण सवलत देण्याकरिता आवश्यक प्रोमो कोड www.mtdc.co या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामुळे आरक्षणात पारदर्शकता राहणार आहे. महामंडळाद्वारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या पर्यटक निवासासाठी तसेच अतिरिक्त बेड, कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, उपहारगृहांमधील नाश्ता आणि जेवण यासाठी ही सवलत लागू असणार नाही. या सवलतीस अनुसरून केलेले आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच ज्या महिलांच्या नावे आरक्षण असेल त्या महिलांनी पर्यटक निवासाच्या ठिकाणी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.
‘अतिथी देवो भव’ या नीतीची अंमलबजावणी करणाऱ्या महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आलेल्या महिला अतिथींचे स्वागत करण्यासाठी महामंडळ तत्पर आहे.
महामंडळाचे सर्व पर्यटक निवास सुरक्षित आणि आरामदायक असून निसर्गरम्य वातावरणात स्थित आहेत. शासनाने कोरोनाबाबतचे निर्बंध शिथील केले असल्याने महामंडळाची सर्वच पर्यटक निवासस्थाने मोठ्या प्रमाणावर आरक्षित होत असून महिलांसाठीच्या या सवलतीमुळे पर्यटनाचा आनंद द्विगुणित होणार आहे. महामंडळाकडून महिलांचा सन्मान केला जात असल्याने महिला पर्यटकांमधूनही समाधान व्यक्त होत असून अधिकाधिक महिला पर्यटकांनी या आरक्षण सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी केले आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/vP34cTW
https://ift.tt/Zq3aDUh
No comments:
Post a Comment