मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईला दोन दिवस उलटत नाही तोच सक्तवसुली संचलनालयाने (ED) शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे. ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती केली आहे. यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि जमिनींचा समावेश असल्याचे समजते. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. हा शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती. मात्र, मध्यंतरी हा तपास थंडावला होता. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त करत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.
एनएसईएल घोटाळा प्रकरणात आतापर्यंत २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ३२५४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये आता प्रताप सरनाईक यांचीही भर पडली आहे. प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. एनएसईएल घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता ईडीने सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एनएसईएल कंपनीतून प्रताप सरनाईक यांच्या विहंग आणि आस्था या कंपन्यांमध्ये पैसे आले होते. त्यासाठी खोट्या बिलांचा वापर झाला होता. त्यामुळेच ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. पण प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. त्यामुळे ईडीला प्रताप सरनाईक यांची फारशी चौकशी करता आली नव्हती. मात्र, आता ईडीने थेट सरनाईक यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.
No comments:
Post a Comment