अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्पासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून निधी – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे - latur saptrang

Breaking

Monday, April 4, 2022

अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्पासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून निधी – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ४ : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील भुयारी गटार योजनेच्या उर्वरित कामासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून १५ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून याचा प्रस्ताव तातडीने विभागाकडे सादर करण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.

अंबड शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाच्या संदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठकीस सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हाधिकारी  डॉ. विजय राठोड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सन २००७ मध्ये यूआयडीएसएसएमटी योजनेमधून अंबड शहरातील भुयारी गटार योजनेसाठी मल:निस्सारण प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पास १३.४८ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती,  या योजनेवर आतापर्यंत १३.३५ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या प्रकल्पाचे काम सिडकोकडून करण्यात येत असून या प्रकल्पात आता नव्याने दोन भागांचा समावेश झाल्यामुळे कामाच्या व्याप्तीमध्ये वाढ झाली आहे. या योजनेतून भूमिगत गटारांचे जाळे आणि काही वैयक्तिक घर कनेक्शन्सची कामे करण्यात आली असून प्रतिदिन ३.५० दशलक्ष लीटर क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पातील मल:निस्सारण वाहिन्यांचे जाळे, अतिरिक्त वैयक्तिक घर कनेक्शन्स, शारदानगर आणि चांगले नगर या नव्या भागांच्या समावेशाने त्यातील वाहिन्यांचा विस्तार, पंप हाऊसपासून मुख्य गुरुत्ववाहिनी आदी कामे करण्यासाठी निधीची गरज असून हा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी  पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केली.

अंबड शहरातील भुयारी गटार योजनेचे काम निधीअभावी  रेंगाळणार नाही, याकडे लक्ष देऊन या प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले, अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्ताव तातडीने नगरविकास विभागाकडे पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी जालना आणि नगरपंचायत अधिकाऱ्यांना दिल्या.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/HSWBLb3
https://ift.tt/FdrT5zB

No comments:

Post a Comment