मुंबई, दि. 4 :- पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या मराठा सैनिकांना स्मारकस्थळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हरियाणा राज्यातील रोड मराठा संघटनेच्या विनंतीवरून पानिपत येथील युद्ध स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे याबाबत येथील स्थानिक शासकीय अधिकारी आणि रोड मराठा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तेथील समस्या डॉ.गोऱ्हे यांनी जाणून घेतल्या.
मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा निर्माण व्हाव्यात याकरिता विशेष प्रयत्न करण्याची सूचना यावेळी स्थानिक प्रशासनाला करण्यात आली. या कामासाठी वित्त आयोगाच्या जिल्हा नियोजन अथवा लोकप्रतिनिधींच्या निधीतून विकासकामांचे नियोजन करण्याबाबत माहिती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पानिपत येथील स्थानिक अधिकारी यांना दिल्या. स्थानिक जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभाग आणि राज्य शासनाकडून याकरिता प्रयत्न होण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पानिपत स्मारक परिसरात अत्यावश्यक सुविधांबाबत चर्चा
सद्यस्थितीत स्मारकाची दैनंदिन व्यवस्था चोख असण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. या स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रत्येक वर्षी १ लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पर्यटकांच्या व स्मारकाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक म्हणून होम गार्ड यांची नेमणूक करणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, स्वच्छता राखणे, तसेच स्मारकामध्ये सीसीटीव्हीची सुविधाही आवश्यक आहे. प्रकाश योजना असलेला लाईट शो, हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सुसज्ज कॅन्टीन, युद्धाची आणि इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय या स्मारकाशेजारी उभारावे, ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पुस्तकांचे वाचनालय – ग्रंथालय, पर्यटकांसाठी प्रशिक्षित गाईड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी हरियाणा रोड मराठा संघटनेचे गुरदयाल सिंग, झिले सिंग, राजेशकुमार चोपडा, बळबिर सिंग कल्याण, भीम सिंग, रामणारायन मराठा, मराठा राजेंद्र शेरा, कमलजीत महाले, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, हरियाणा, मुलतानसिंग महाले, श्री.महेंद्र काज, पानिपतचे दंडाधिकारी राजेशकुमार सोनी, पुरातत्व विभागाचे अधिकारी वेदप्रकाश, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त झेलम जोशी, श्री. रवींद्र खेबुडकर, योगेश जाधव, प्रवीण सोनावणे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/fV0Q36s
https://ift.tt/UjzZVAM
No comments:
Post a Comment