नवी मुंबई, 28: राज्यस्तरीय बँकर्स काँक्लेवमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहाय्यता गटांच्या सदस्यांना पतपुरवठा करण्याचे निश्चित केलेले उद्दिष्ट 100% पूर्ण करणाऱ्या बँकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, UCO बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा तसेच HDFC बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचा आजच्या काँक्लेव मध्ये सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक गंगोपाध्याय, भारतीय रिझर्व बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप कुलकर्णी, राज्य बँकर्स समितीचे सहाय्यक व्यवस्थापक भरत बर्वे, अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी यांच्या हस्ते विशेष बाब म्हणून या सर्व बँकर्सना सन्मानित करण्यात आले. मागील आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील सर्व बँकांनी मिळून 3 हजार 600 कोटींचा पतपुरवठा केलेला आहे. इतका मोठा पतपुरवठा स्वयंसहाय्यता गटांना होण्याची राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याची भावना अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी बोलून दाखविली. चालू आर्थिक वर्षामध्ये सर्व बँकांनी मिळून किमान 5 हजार कोटींचा पतपुरवठा गटांना करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी सर्व बँकर्स यांच्या बदलत्या दृष्टिकोनाचे स्वागत करताना आणखी सकारात्मक होऊन ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
नाबार्डचे उप महाव्यवस्थापक गंगोपाध्याय यांनी गटांना कर्ज देणे म्हणजे सामाजिक कार्य नव्हे तर पूर्णत: नात्यातला बँकिंग व्यवसाय आहे, त्यामुळे आणखी पुढे येऊन बँकांनी गटांना पतपुरवठा करावा असे आवाहन केले. यावेळी रिझर्व बँकेचे श्री.कुलकर्णी आणि राज्य बँकर्स समितीचे श्री बर्वे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
काँक्लेवमध्ये ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटांचे आर्थिक समवेशन करण्यासाठी जो पतपुरवठा करण्यात येतो त्यामध्ये येणारे अडथळे, त्यातून निघू शकणारे मार्ग, कर्ज परतफेडीसाठी आवश्यक मार्गदर्शन, मिळालेल्या कर्जातून उत्तम आणि योग्य व्यवसायाची निवड याबद्दल अधिकारी आणि बँकर्स यांच्यात सुसंवाद घडून आला. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच हा काँक्लेव होत असल्याने राज्यातील स्वयंसहाय्यता गटांना चालू आर्थिक वर्षात किमान 5 हजार कोटी पतपुरवठा करण्याच्या प्रयत्न यशस्वी होण्यास मदत होणार असल्याची भावना सर्वांकडून व्यक्त करण्यात आली मोठे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या आवाहनाला सर्व बँकर्स यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प सर्वांनी केला.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/5Y0JpLe
https://ift.tt/5f4i1KD
No comments:
Post a Comment