मनपाकडून मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे वेगात
८ दिवसात कामे पूर्ण करण्याच्या महापौरांच्या सूचना
लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या नाल्यांची सफाई केली जात आहे. नव्याने विकसित झालेल्या वस्त्यात या स्वच्छते बाबतीत विशेष लक्ष द्यावे तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात कोठेही पाणी तुंबून राहणार नाही,याची दक्षता घ्यावी आणि आगामी आठ दिवसात ही कामे पूर्ण करावीत,अशा सूचना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रशासनास केल्या आहेत.
आगामी पावसाळा लक्षात घेता मनपाने ही मोहीम हाती घेतली आहे.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अशी कामे केली जातात. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांची स्वच्छता केली जाते.शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे.अनेकदा पाण्यासोबत वाहत आलेला कचरा या नाल्यांमध्ये साठून राहतो.त्यामुळे पावसानंतर हे नाले तुंबतात.तसे प्रकार होऊ नयेत याची दक्षता घ्यावी,अशा सूचना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वच्छता विभागास केल्या आहेत.
विविध प्रभागात असणाऱ्या मोठ्या नाल्यांची स्वच्छता सध्या केली जात आहे.त्यापाठोपाठ छोटे नाले स्वच्छ केले जातील. नव्याने विकसित होणाऱ्या वस्त्यांमध्येही मान्सूनपूर्व साफसफाईची कामे केली जावीत असेही त्यांनी सूचित केले
पावसाळ्यास प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या काही दिवसात गटारी तुंबल्याचे प्रकार घडल्याचे दिसून येते.पहिल्या पावसानंतर कोठेही पाणी तुंबून राहणार नाही याची दक्षता घ्यावी,असेही महापौरांनी प्रशासनास सूचित केले आहे.
No comments:
Post a Comment