राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांनी दि. १० एप्रिल २०२२ रोजी अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेला एक कोटींचा शिष्यवृत्ती निधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन दिले होते.
आज या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याहस्ते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त मा. हेमंत टकले यांच्या उपस्थितीत रुपये एक कोटींचा धनादेश श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव श्री. शेषराव खाडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते दि. १० एप्रिल रोजी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात साहेबांनी एक कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. या निधीतून वैद्यकीय आणि कृषी शाखेत शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येकी तीन विद्यार्थींनींना शिष्यवृत्ती देण्यात यावी, असे साहेबांनी सांगितले होते. या निधीमुळे आता सहा मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करेपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
हा धनादेश संस्थेकडे सुपुर्द करत असतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्षा व मुंबई मनपा गटनेत्या राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस हरीश सणस, प्रदेश उपाध्यक्ष बापू भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मंत्रालयीन समन्वयक प्रसाद उकीर्डे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment