इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकस्थळी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी - latur saptrang

Breaking

Thursday, May 19, 2022

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकस्थळी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी

गाझियाबाद उ. प्र. दि. 19 : मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य 350 फुटी पुतळा बसवण्यात येणार असून या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील प्रसिद्ध मूर्तीकार पद्मभूषण राम सुतार यांच्या फाईन आर्टस् या कारखान्यात सुरू आहे. या ठिकाणी पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली असून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे, यांसह राज्य शासनाच्या समितीने गाझियाबाद येथे भेट देऊन या कामाची आज पाहणी केली.

मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य अंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत असून, त्याच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाने घेतलेली आहे. राज्य सरकारने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली असून, या समितीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचाही समावेश आहे. स्मारकस्थळी उभारण्यात येणार असलेला पुतळा अंतिम करण्याची जबाबदारी देखील या समितीकडे असल्याने आज गाझियाबाद येथे या समितीने भेट देऊन पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली.

सदर 25 फुटी प्रतिकृती तयार करताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काही बदल त्यामध्ये पूर्वी सुचवले होते. ते बदल करून राम सुतार यांनी 25 फुटी प्रतिकृती साकारली आहे. पद्मभूषण राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकासह अनेक पुतळ्यांचे काम यापूर्वी केलेले आहे.

सदर प्रतिकृतीची पाहणी करताना धनंजय मुंडे यांसह समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शरीरयष्टीप्रमाणे पाय, पोट, डोके आदी रचना हुबेहूब असाव्यात याबाबत आणखी काही बदल आज सुचवले आहेत. हे बदल पूर्ण करून त्यास एमएमआरडीए व राज्य शासनाच्या समितीची मान्यता घेतल्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेता येणार असल्याचे श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

सुमारे 1100 कोटी रुपये खर्चून इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम करण्यात येत असून, इंदूमिल येथे ज्या 100 फुटी पिलर वर मुख्य पुतळा बसवण्यात येणार आहे, त्या पिलरचे 75% काम पूर्ण झाले असून, लवकरच ते काम पूर्ण केले जाणार आहे. पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली असून, त्यात काही बदल सुचवले आहेत, ते पूर्ण झाल्यानंतर मुख्य पुतळ्याच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात येईल. निधी उपलब्ध होण्याबाबत कोणतीही अडचण नसल्याने हे काम वेळेत पूर्ण होईल, असे यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथे बसवण्यात येणाऱ्या मुख्य पुतळ्याची निर्मिती ही प्रतिकृती अंतिम झाल्यानंतरच सुरू करण्यात येईल, यासाठी प्रतिकृतीचे काम वेळेत पूर्ण केले जावे, अशा सूचना यावेळी मंत्रिमंडळ समितीने शिल्पकार राम सुतार व त्यांच्या टीमला दिल्या आहेत. यावेळी श्री. मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सर जे जे चे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, इतिहास तज्ज्ञ रुबी मलेपीन, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, पद्मभूषण राम सुतार, अनिल राम सुतार, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव दिनेश डिंगळे, शापुरजी पालोनजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश साळुंखे, प्रकल्प सल्लागार अतुल कवटीकवार, विनय बेडेकर, प्रशांत गेडाम आदी उपस्थित होते.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/TSfB2qz
https://ift.tt/vEsVMne

No comments:

Post a Comment