आजच्या काळात राजकीय व्यंगचित्रकारांची वानवा – उद्योगमंत्री सुभाष देसाई - latur saptrang

Breaking

Wednesday, May 4, 2022

आजच्या काळात राजकीय व्यंगचित्रकारांची वानवा – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 4 : जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टुनिस्ट कम्बाईनच्यावतीने भरविण्यात आलेल्या ‘व्यंगचित्र जत्रा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे सचिव तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.

‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या विषयावर आधारित हे प्रदर्शन असून महाराष्ट्रासह देशभरातील व्यंगचित्रकारांसोबत रशिया, चीन, युक्रेन, युरोप, इराक आदी देशांतील व्यंगचित्रकारांनी यात सहभाग नोंदविला आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना व्यंगचित्रकार असल्याचा नेहमी अभिमान वाटे. त्यांनी व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांवर कायम प्रेम केले. व्यंगचित्रकारांच्या घटत्या संख्येबाबत ते चिंतीत होते. त्यात राजकीय व्यंगचित्रकार निर्माण होत नसल्याची खंत ते व्यक्त करत. आजही तिच परिस्थिती कायम आहे. दरम्यान, आम्ही मार्मिकचे स्वरुप बदलले असून राजकीय विषयावर चपखल भाष्य करणाऱ्या व्यंगचित्रकारांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजच्या या प्रदर्शनातून हा शोध पूर्ण होईल, अशी अपेक्षा मंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक वेगाने पूर्ण होत असून या ठिकाणी व्यंगचित्रासाठी स्वतंत्र दालन असेल. त्या ठिकाणी माहिती, प्रदर्शन, कार्यशाळा भरविण्यात येईल.

यावेळी कार्टुनिस्ट कंम्बाईनचे अध्यक्ष संजय मेस्री यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि कार्टुन या विषयी सखोल माहिती दिली. तसेच व्यंगचित्र संस्था निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी कार्टुन अकादमीसाठी जागा उपलब्ध होईल, असे नमूद केले. यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, चारुहास पंडीत आदी उपस्थित होते

दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन परिसरात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ते आज व उद्या सकाळी 10 ते 8 या वेळेत खुले असेल.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/9Kw5UhY
https://ift.tt/ZsNqUlE

No comments:

Post a Comment