अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्हा व शहर आढावा बैठक संपन्न
धुळे जिल्ह्यात प्रत्यक्ष दौरा करून जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी महिनाभरात तयार करा - प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे
नाशिक,दि.४ मे :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संघटन गाव पातळीवर अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्यक्षात जिल्ह्याचा दौरा करून सक्षम अशा उमेदवारांना कार्यकारणीत सामावून घ्यावे व महिनाभराच्या आत नूतन कार्यकारिणी जाहीर करावी अशा सूचना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिल्या.
आज त्यांच्या उपस्थितीत धुळे येथे धुळे जिल्हा व शहर आढावा बैठक पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, विलास माळी ,अनिल नळे, संतोष पुंड, आंण्णा माळी, भानुदास लोहार, सुभाष जगताप,महानगर प्रमुख गोपाल देवरे, उपाध्यक्ष संतोष भोई,पिंटु माळी, योगेश बागुल, उमेश महाजन, ज्ञानेश्वर महाजन, प्रशांत माळी, योगेंद्र माळी, चेतन खैरनार, राजेंद्र चौधरी, सुनिल चौधरी, गुलाब माळी, राहुल माळी, रशिफ पठाण, वसंत माळी, विशाल माळी, एकनाथ अडावदकर इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आणि कार्यक्षम उमेदवार कार्यकारिणी सहभागी करून घ्यावे. बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला यात सामावून घ्यावे. कार्यकारिणी तयार करताना जिल्ह्यात गाव पातळीवर दौरा करून काम करणाऱ्या व्यक्तींना संधी देण्यात यावी. पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे देखील संघटन करण्यात यावे असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक म्हणाले की, मंडलला कमंडल आडवे आले आणि आरक्षणाला धक्का बसला. हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आपल्या सर्वांना मंत्री छगन भुजबळ साहेब यांचे हात अधिक बळकट करावे लागतील. यासाठी सर्व बहुजन समाजातील घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच आपला आवाज पुढे जाऊ शकतो आणि आपण आपले हक्क मिळवू शकतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment