प्रवाशांना एसटीच्या माध्यमातून सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार - latur saptrang

Breaking

Wednesday, June 1, 2022

प्रवाशांना एसटीच्या माध्यमातून सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.१: राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

स्वारगेट बसस्थानक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या विद्युत बससेवेचा शुभारंभ आणि विद्युत प्रभारक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला परिवहनमंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, गुणवत्ता वाढीसाठी नवीन बदल करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास निश्चित करणे हेच एसटीचे ध्येय आहे. याच उद्दिष्टावर आधारित प्रदूषण विरहित, आवाज विरहित ‘शिवाई’ बस आहे. नागरिकांनी निश्चितपणे या बससेवेचा लाभ घ्यावा. समाजातील सर्व घटकांना एसटीची सेवा आपली वाटली पाहीजे यासाठी सर्व सोईसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नजीकच्या काळात प्रत्येक आगारात विद्युत प्रभारक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकार त्यासाठी आवश्यक सहकार्य करीत आहे.

एसटीवरचा जनतेचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता यावा यासाठी व्यवस्था वाढविण्यात येत आहेत. प्रवाशांच्या गरजा ओळखून एसटीने काळानुरूप अनेक बदल केले. निमआराम, वातानुकुलित बस, अश्वमेध, शिवनेरी अशा बससेवा सुरू करण्यात आल्या. २०१७ मध्ये शिवशाही बस महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली आणि आता विद्युत घटावर चालणारी बससेवा सुरू होत असून हा महत्वपूर्ण प्रसंग असल्याचा उल्लेखही श्री.पवार यांनी केला.

शिवाई बसमध्ये वायफाय यंत्रणा देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी याचा उपयोग होईल असे सांगून राज्य परिवहन महामंडळाच्या ७४ वर्षाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या चालक, वाहक, अधिकारी, कर्मचारी यांना धन्यवाद दिले. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी शासन सर्वांच्या बरोबर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एसटीच्या इंधनावर होणारा खर्च वाढला आहे   गेल्या वर्षात शासनाने २ हजार  ६०० कोटींची मदत केली. एसटीला समस्येतून बाहेर काढण्यासाठी कायमचा उपाय शोधण्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात येत आहेत. फायदेशीर मार्गावर येणारा महसूल अन्य मार्गावर वळविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी  लागेल. नव्या सुविधा देऊन महसूल वाढविण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी प्रास्ताविक केले. एसटी बससेवा तसेच महामंडळाच्या विविध सेवेबरोबरच ‘शिवाई’ बस सेवेबाबत त्यांनी माहिती दिली. शिवाई बस लवकरच राज्यातील विविध विभागात सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या शिवाई बसची वैशिष्ट्ये

शिवाई बस विद्युत घटावर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलीत व आवाज विरहित आहे. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वनियंत्रित वातानुकुलित लुव्हर बसविण्यात आले आहे व त्या सोबत वाचण्यासाठी स्वतंत्र दिवा देण्यात आला आहे. ही बस १२ मीटर लांबीच्या सांगाड्यावर बांधण्यात आली असून तिची रुंदी २.६ मीटर व उंची ३.६ मीटर आहे. सांगाड्याच्या खालच्या बाजूस बसच्या मधोमध प्रशस्त असा सामान कक्ष देण्यात आला आहे.

शिवाई बसमध्ये ४३ प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असून प्रवासी सीट हे ‘पुश बॅक’ प्रकारचे देण्यात आले आहे. प्रत्येक दोन सीटच्यामध्ये दोन्ही प्रवाशांचे मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे. चालक केबिनमध्ये प्रवाशी घोषणा यंत्रणा बसविली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी यंत्रणा असून त्याचे बटन चालक कक्षात देण्यात आले आहे. प्रवासी कक्षातील हालचालीवर देखरेखीसाठी कॅमेरा प्रवाशी कक्षात बसविण्यात आले आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अँड्रॉईड टीव्ही बसविण्यात आला आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Og4erJn
https://ift.tt/TnUBdGf

No comments:

Post a Comment