शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव - latur saptrang

Breaking

Saturday, June 11, 2022

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

मुंबई, दि. 11- मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 15 जून रोजी तर विदर्भात 27 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंबंधीच्या परिपत्रकाद्वारे शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.

इयत्ता पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करावे. फूल देऊन किंवा शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहील असे व्यवस्थापन करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांच्या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत असल्याचे स्पष्ट दिसून येत नाही. तसेच शाळांतील शैक्षणिक सोयीसुविधा अस्ताव्यस्त झालेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी आणि दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित असल्याने हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मागील काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2On0KAW
https://ift.tt/unb4Nx5

No comments:

Post a Comment