मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला दोन वर्षांपूर्वी साठ वर्षे पूर्ण झाली. या हीरक महोत्सवानिमित्त ‘ग्रंथाली’ने तीन महत्त्वपूर्ण खंडांची निर्मिती केली आहे. मराठी भाषा, साहित्य-संस्कृती आणि विज्ञान या क्षेत्रांत गेल्या सहा दशकांत काय प्रगती झाली, काय राहिले याची वस्तुनिष्ठ नोंद घेणारे हे खंड आहेत. सोमवार, 27 जून 2022 रोजी ‘ग्रंथाली’ व ‘मराठी भाषा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या खंडांचे प्रकाशन दुपारी 1.00 वा. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात होणार आहे.
यावेळी मराठी भाषा सचिव भूषण गगराणी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ‘विज्ञान-तंत्रज्ञानात हीरक महोत्सवी महाराष्ट्र’ (संपादक विवेक पाटकर, हेमचंद्र प्रधान); ‘मोहरा महाराष्ट्राचा’ (संपादक रमेश अंधारे); ‘मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान’ (संपादक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. अजय देशपांडे) असे हे तीन महत्त्वपूर्ण खंड आहेत.
संग्राह्य असणाऱ्या या तीन खंडाच्या संचाची मूळ 3,000 रुपये असून ‘ग्रंथाली’ने केवळ 1,500 रुपयांत उपलब्ध केला आहे, असे ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर यांनी म्हटले आहे. प्रकाशनाचा हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार असल्याचे कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी कळवले आहे.
००००
अर्चना शंभरकर/विसंअ/24.6.2022
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/jEKubvJ
https://ift.tt/anBX5sd
No comments:
Post a Comment