मुंबई, दि. 5 – विद्यार्थ्यांना भविष्यात येणारे तंत्रज्ञानातील बदल, जागतिकीकरणातील अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ ची सुरूवात होत आहे. याअनुषंगाने ‘एचसीएल’ तसेच ‘ईएन पॉवर’ यांच्यासमवेत दोन सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्यातील कल्पकता आणि सर्जनशीलता ह्याच आपल्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीच्या दिशा ठरवतील. विद्यार्थ्यांना भविष्यात येणारे तंत्रज्ञानातील बदल, जागतिकीकरणातील अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि जीवन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ राबविण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमामुळे तरूणांना स्वतःमधील प्रतिभा ओळखण्यास मदत होईल व त्यापुढील करिअरची दिशा ठरवता येईल.
या अनुषंगाने एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीच्या ‘टेक-बी’ या उपक्रमांतर्गत या वर्षी इयत्ता 11 वी व 12 वीच्या जवळपास 20 हजार विद्यार्थ्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर याच कंपनीत पात्र विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. त्याचप्रमाणे ‘स्वजीवी महाराष्ट्र’ (स्वप्न, जिद्द आणि विश्वास) या उपक्रमांतर्गत शालेय विद्याथ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडविण्यासाठी 488 आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग आणि ‘ईएन पॉवर’ यांच्या संयुक्त विद्यमाने समग्र उद्योजकता घडविणारा उपक्रम राबविला जाईल.
सोमवार दि. 6 जून रोजी यासंबंधीचे सामंजस्य करार करून या उपक्रमांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहितीमंत्री प्रा.गायकवाड यांनी दिली. सदर कार्यक्रम मुंबईसह राज्यातील सर्व 36 जिल्ह्यामधील व्हर्चूअल क्लासरूमच्या माध्यमातून लाईव्ह करण्यात येत आहे. विभागीय स्तरावर नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर येथे आजपासून विद्यार्थी नोंदणी होत आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/rL9WacT
https://ift.tt/wb7vAVG
No comments:
Post a Comment