बालगृहातील १४४ विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण - latur saptrang

Breaking

Monday, June 13, 2022

बालगृहातील १४४ विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण

मुंबई, दि. 13 : नुकत्याच झालेल्या उच्च माध्यमिक शालान्त (बारावी) परीक्षेत राज्यातील बालगृहातील 144 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळविले आहे. यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी  75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी बालगृहातील या  विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले व या मुलांनी केलेल्या अविरत अभ्यासामुळे हे यश मिळाले आहे. बालगृहातील मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत नेहमीच घेतली जाते. या मुलांना शिक्षणासाठीही विभागामार्फत मदत व मार्गदर्शन केले जाते.

राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते, असे  मंत्री ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

राज्यात पुणे जिल्ह्यातील बालगृहातील सर्वाधिक 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबई शहरातील 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी  कला शाखेतील 2 विद्यार्थ्यांनी 75 ते 85 टक्के गुण मिळविले आहेत. वाणिज्य शाखेतील 11 विद्यार्थ्यांनी 65 ते 75 टक्के गुण मिळविले आहेत. विज्ञान शाखेतील 3 विद्यार्थ्यांनी 75 ते 85 टक्के गुण मिळविले आहेत.

——

शैलजा पाटील/विसंअ/13.6.22

 

 



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/XN5I97U
https://ift.tt/uHB9V5i

No comments:

Post a Comment