Latur Crime | लातूरमध्ये दहा लाखांचा गुटखा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई
चाकूर (जि.लातूर) : सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने चाकूर व हाळी (ता.उदगीर) येथील गुटखा विक्रेत्यावर धाड टाकून दहा लाख रूपयांच्या गुटख्यासह टेम्पो व कार जप्त केली आहे. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम व चाकूर (Chakur) पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी शुक्रवारी (ता.दहा) सकाळी बाराच्या सुमारास शहरातील दुकानांची तपासणी केली.
यावेळी सोसायटी चौकातील गंगाधर सोमवंशी व राजेश्वर सोमवंशी यांच्या दुकान व घरातून २ लाख ९६ हजार ७४० रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. लिबुंनी गल्लीतील अहेमद लालुभाई व गफुर लालुभाई यांच्या घरी एक लाख २३ हजार १८० रूपयांचा गुटखा सापडला आहे. तिरमल माने व रमन माने यांच्या घरातून दोन हजार नऊशे रूपयांचा गुटखा सापडला आहे. हाळी हडंरगुळी येथील ओमकार कालवणे यांच्या कडून ३० हजार ३३५ रूपयाचा गुटखा, रोशन तांबोळी यांच्याकडून ३ लाख ७१ हजार २५ रूपयाचा गुटखा, सुनिल माचेवाड यांच्याकडून ३४ हजार आठशे रूपयाचा गुटखा, विष्णु हमदळे यांच्याकडून ७५ हजार सहाशे रूपयाचा गुटखा, रामदार चिंतलवार यांच्याकडून ६५ हजार चारशे रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. (Latur Crime Update)
चाकूर येथून चार लाख ९२ हजार ८२० रूपये व हाळी हंडरगुळी येथून पाच लाख ७७ हजार १७५ रूपयाचा गुटखा यासोबतच टेम्पो व कार जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. चाकूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजु झालेले सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी सुरूवातीपासून अवैध व्यवसायाविरूद्ध बडगा उगारला आहे.
No comments:
Post a Comment