स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप
लातूर/ प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि दिनांक 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध कलागुणांचे यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दिनांक 15 जुलै 2022 रोजी करण्यात आले होते.
हा कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर आणि माऊली हॉस्पिटल अॅण्ड क्रिटीकल केअर सेंटर (डझज अलमलकर मॅडम) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे सरांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख रमेश मिटकरी यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमामध्ये बोलताना कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. मरे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना विविध विषयावर मार्गदशन केले. यामध्ये त्यांनी प्रशिक्षीत विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांनी अवगत केलेल्या प्रशिक्षणाचा सद्उपयोग करुन त्यांच्या भावी आयुष्यात यशस्वी उद्योजक बनून स्वतः बरोबर समाजातील आर्थिक विषमतेला संपवण्याची आव्हाने पेलावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याशिवाय शासनाकडून राबविण्यात येणार्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत चालणारे योजनेचे महत्व ही उपस्थितांनी समजावून सांगितले.
तसेच कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक श्री अमोल क्षिरसागर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील ध्येय साध्य करत असताना कशा प्रकारे परिश्रम करावे याबद्दल ही विस्तृत स्वरुपात मार्गदर्शन केले. या शिवाय प्रशिक्षणा दरम्यान लक्षपूर्वक आणि गांभिर्याने प्रशिक्षण घेणार्या प्रशिक्षणार्थींना शासनाच्या विविध मदतगार ठरणार्या अन्य योजनांबद्दल ही माहिती सांगितली.
या नंतर प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी प्रतिक सावळे यांनी केले तर कार्यक्रमासाठी उपस्थित असणार्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्रीमत अलमलकर मॅडम यांनी केले. या प्रशिक्षणामुळे जवळपास 30 विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने त्यांना त्यांच्या भावी जिवनासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment