हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - latur saptrang

Breaking

Sunday, July 17, 2022

हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 17: केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात भारताला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा कार्यक्रमाबाबत केंद्रीय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बगेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नागालँडचे मुख्यमंत्री नैफीयू रीओ, आसामचे मुख्यमंत्री हिमानता बिस्वा सर्मा यांनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

या बैठकीसाठी मंत्रालयातून मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येणार आहे.आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करणार असून राज्यातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले याबरोबरच स्वयंसेवी संस्था, वेगवेगळ्या सहकारी संस्था या सर्वांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे.  राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वॉर्ड किंवा ग्रामस्तरीय लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण आपण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे काम असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा हे अभियान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यात येईल.

हर घर तिरंगा अभियानातून घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आज भारत वेगवेगळया क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहेत. गेल्या 75 वर्षांत भारताने केलेला प्रवास जगाने पाहिला आहे. पुढील 25 वर्षांमध्ये आपला देश वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणार आहे. आजादी का अमृतमहोत्सव साजरा करताना राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानातून भारतातील प्रत्येक घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

श्री. शहा म्हणाले की, हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. हे अभियान केंद्र शासनाचे जरी असले तरी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा आणि लोकसहभागाशिवाय हे अभियान अपूर्ण आहे. हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणे, अभियानासाठी प्रत्येक घरी तिरंगा पोहोचेल आणि 13 ते 15 दरम्यान घरावर हा तिरंगा फडकेल अशा तीन टप्प्यांमध्ये या अभियानाची पूर्तता होणार आहे.  हर घर तिरंगा या अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्याने राज्यातील प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करावी. 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रभात फेरीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची लढाई कशी होती याची माहिती प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात यावा. गावांमध्ये, तालुक्यांमध्ये 1 तास प्रभातफेरी काढण्यात यावी. केंद्र शासनामार्फत सुध्दा वेगवेगळया माध्यमातून राज्यांसाठी झेंडे उपलब्ध करण्यात येणार असून पोस्ट ऑफीसमध्ये सुध्दा तिरंगा मिळणार आहे. केंद्र शासनाने सुरु केलेल्या संकेतस्थळावर आपले फोटो आणि सेल्फी पाठवून आपण या अभियानात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहिदांनी दिलेले बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी केलेले काम आजच्या पिढीला, तरुण वर्गाला समजावे, माहिती व्हावे आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठीच हर घर तिरंगा हा उपक्रम देशभरात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे.भारताने गेल्या 75 वर्षात केलेली प्रगती याबरोबरच पुढील 25 वर्षांत भारत जगात आपली वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचासुध्दा प्रयत्न यामध्ये होणार आहे. संकल्प से सिध्दी या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढची 25 वर्षातील वेगवेगळया क्षेत्रातील प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहेत. कृषी, उत्पादन, सेवा, सहकार , शिक्षण, पायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात भारताची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री यावेळी म्हणाले.

आजादी का अमृतमहोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देले आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने देशाचे स्वातंत्रय मिळविताना अनेक संकटांचा सामना केला मात्र आज जगभरात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात ही ओळख टिकवून ठेवत अनेक क्षेत्रातील भारताचे सर्वोच्च स्थान टिकवून ठेवणे यालाच प्राधान्य असणार आहे. येत्या 22 जुलैपासून या अभियानाची सुरुवात होणार असून प्रत्येक राज्यानेसुध्दा त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर याबाबत प्रचार आणि प्रसिध्दी सुरु करावी. हर घर तिरंगा याबाबतची माहिती देत असताना वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमांचा सुध्दा यामध्ये वापर करण्यात यावा असेही श्री. शहा यावेळी म्हणाले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/J7D9VRY
https://ift.tt/YyiFuSE

No comments:

Post a Comment