छगन भुजबळ यांनी नाशिक शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
सत्ता असो वा नसो शरदचंद्र पवार साहेब यांचे नेतृत्व अखंडितपणे उच्चस्तरावर राहील- छगन भुजबळ
नाशिक,दि.९ जुलै:- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून येणाऱ्या काळात पक्षसंघटना अधिक मजबुत करण्यासाठी काम करायचे आहे. प्रत्येक तालुका,गावे, शहर आणि वॉर्डावॉर्डातील बूथ कमिट्या मजबूत करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा असे आवाहन करत सत्ता असो वा नसो शरदचंद्र पवार साहेब यांचे नेतृत्व अखंडितपणे उच्चस्तरावर राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज राष्ट्रवादी भवन नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे,आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार देविदास पिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिवराम झोले,डॉ.सयाजीराव गायकवाड,अशोक सावंत, निवृत्ती अरिंगळे, ऍड.शिवाजी सहाणे, सचिन पिंगळे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहर सरचिटणीस संजय खैरनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यानंतर तीन ते चार चक्रीवादळ आली. अतिवृष्टी, महापूर, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीतून लोक सावरत असतांना लगेच राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले. या अनेक संकटांचा सामना करत असतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील नागरिकांचा जीव वाचविण्यासोबतच अनेक विकासाची कामे राज्यात केली. उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यकाळात कोरोनाकाळात झालेल्या कामाचे कौतुक अख्या जगभरात झाले. मालेगाव सारख्या ठिकाणी कोरोनाच्या परिस्थितीत आपण स्वतः जाऊन अनेक वेळा बैठका घेतल्या. सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर आपण मात करू शकलो. या कालावधीत साडेबारा कोटी जनतेला ५४ हजार रेशन दुकानदारांच्या माध्यमातून अन्न, धान्याचे वाटप तसेच शिवभोजनच्या माध्यमातून जनतेला मोफत अन्न पुरविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. तसेच दोन लाखांवरील अधिक कर्ज असणाऱ्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यातील जनतेला विकासाची दिशा मिळवून दिली. जे आपल्या विचारांचे सरकार राज्यात होते. त्या सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने सूडबुद्धीने कारवाया करण्यात आल्या मात्र आम्ही कधी घाबरलो नाही. ईडीच्या कारवाईमुळे अनेक लोक भाजपमध्ये गेले. आता राज्यात ईडीचे सरकार आले आहे हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता सरकारने चांगलं काम करावं असे सांगत ईडीचं कार्यालय अडीच वर्षे बंद ठेवावे असा चिमटा त्यांनी काढला. महाविकास आघाडीने घेतलेल्या जिल्हा नियोजनात मंजूर कामांना सरकारने स्थगिती दिली आहे. सर्वात अगोदर स्थगिती देण्याची घाई नाशिक मध्ये केली. मी कधीही निधी हा स्वतःसाठी मागितला नाही तर सर्व लोकप्रतिनिधींना सम प्रमाणात द्या त्यांच्या मागण्यांनुसार द्या असे आदेश मी दिले होते. नाशिकच्या विकासात खीळ बसू नये म्हणून कोरोना झाला असतांना देखील मी ऑनलाईन बैठका घेतल्या आणि जनतेची कामे थांबू नये असे आदेश दिले. नाशिक जिल्ह्यातील कामे थांबू नये हा आपला उद्देश होता. मात्र आता कामे थांबल्याने कामे होण्यासाठी वेळ लागणार आहे. मात्र सत्ता बदलली तरी मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो या जिल्ह्याचा विकास मी कधीही थांबू देणार नाही असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती म्हणजे अधिक अधिक लोक आपल्यासोबत जोडून घेण्याची. सरकार पडताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण मला त्यांना सांगायचे आहे. की 'बड़ी से बड़ी हस्ती मिट गई हमें मिटाने में, तुम चाहे कितनी भी कोशिश करलो, तुम्हारी उम्र बीत जाएगी हमें झुकाने में' या शायरीद्वारे विरोधकांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मजबूत झाली आहे.सत्ता असली काय आणि नसली काय. जनतेच प्रेम आमच्यावर नेहमी आहे. हे कधी तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेबाबत बोलतांना ते म्हणाले की, काही लोक आरोप करता आहे की ज्यांच्यामुळे बाळासाहेबाना अटक त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करताय पण त्यांना मला सांगायचं की बाळासाहेबांना कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळाला पाहिजे. यासाठी आपण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच कोर्टाकडून अटक झाली तर मातोश्रीला जेल घोषित करून त्यांना तिथे ठेवावे अशी देखील तयारी केली होती.रमाबाई आंबेडकर नगर मधील केस मध्ये मला अडकविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आयोगाने माझ्याबाजूने अहवाल दिला. मी अब्रू नुकसानीचा दावा केला. या केसचा निकाल लागण्याच्या परिस्थितीत शिवसेनेच्या नेत्यांनी माझी भेट घेतली मी कोर्टाची माफी मागत केस मागे घेतली. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मला माफ देखील केलं आणि सहकुटुंब स्नेहभोजनासाठी घरी बोलावले. या सर्व गोष्टी काही लोकांना माहिती नाही त्यामुळे त्यांच्याकडून उगाच चुकीची टिपणी केली जात असल्याचे टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्यांनंतर आपण सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेतली. आणि आजही कुणालाही भेटण्याची आपली तयारी आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत भाजपच्या लोकांनीच खोडा घातला केसेस दाखल केल्या आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत मध्यप्रदेशला जो निर्णय लागू झाला तो महाराष्ट्राला लागू होण्यासाठी आपले प्रयत्न सूरु असून बाठिया कमिशनचा अहवाल कोर्टात सादर केला जाणार आहे.अकरा तारखेला यावर सुनावणी होणार असून ओबीसींचे आरक्षण हे पूर्ववत होईल त्यामुळे राज्यातील ९२ नगरपरिषदा व चार नगरपंचायतीमधील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत यामध्ये देखील ओबीसींना आरक्षण मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते म्हणाले की, देशात महागाई वाढत आहे. सिलेंडरचे दर वाढत आहे. बियाणे खतांच्या किंमती वाढत आहे. निर्यात बंदी मुळे कांद्याला भाव नाही त्यामुळे केंद्र सरकारने यावर लक्ष घालून जनतेला महागाईतून दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. नाशिक जिल्ह्यात अद्यापही पावसाचे प्रमाण कमी असून धरणसाठा खूप कमी आहे. ग्रामीण भागात काही प्रमाणात पाऊस असला तरी अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आजही वाढत आहे. साथरोगाचा फैलाव देखील सुरू आहे. याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याच्या प्रयत्न केला आहे. कोरोनाचा कालावधी असतांना नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ साहेबांनी सातत्याने तालुकावार व जिल्हावार बैठका घेऊन यशस्वी नियोजन केले. रेशनच्या माध्यमातून अन्न, धान्याचा मोफत मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतले. कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा नियोजनचा ५६७ कोटींचा निधी थांबविण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे. हे सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे पैसे आहे. ते कोणीही रोखू शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत असतांना भाजपकडून घाणेरडे राजकारण केले. ही बाब अतिशय दुर्दैवी असून आपण सर्वांनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे. कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना राज्यात नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होऊ शकणार आहे. त्यामुळे तालुकावार जाऊन काम केले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, आमदार सरोज आहिरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, डॉ.सयाजीराव गायकवाड, ऍड.शिवाजी सहाणे,विनोद शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष,सर्व सेलचे अध्यक्ष विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने,जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे,धनंजय निकाळे,माजी नगरसेवक शैलेश ढगे, जगदीश पवार, सुषमा पगारे,शोभाताई आवारे, हरीश भडांगे, मधुकर मौले, मनोहर बोराडे, डॉ.योगेश गोसावी, सुरेखा निमसे, बाळासाहेब गीते, बाळासाहेब मते, राकेश मुंडावरे, डॉ.अमोल वाजे, मनोहर कोरडे, महेश भामरे, शंकर मोकळ, जीवन रायते, मुजाहिद शेख, कुणाल बोरसे, किशोर शिरसाठ, रमेश आवटे, योगिता आहेर, मनीषा काकळीज, हाजी इस्माईल पहिलवान, रुपाली पठारे, मोतीराम पिंगळे, पुष्पा राठोड, भारती भोये, ऍड.सुरेश आव्हाड, गणेश पेलमहाले, बबलू शेलार, राहुल शेलार, बाळासाहेब सोनवणे, चंदे साडे, गौतम पगारे, मिलिंद पगारे, सोमनाथ बोराडे, संगीता सानप, अशोक खालकर, निलेश जगताप, सचिन कलासरे, आशा भदुरे, शंकर मंडलिक, ज्ञानेश्वर महाजन, योगेश दिवे, ऍड.निलेश सानप, नितीन निगळ, जय कोतवाल, सिद्धांत काळे, नितीन तिवडे, शशिकांत पवार, प्रवीण महाजन, नदीम शेख,गणेश गायधनी, चिन्मय गाढे, रियान शेख, दिपक गोगाड, प्रशांत खरात, विशाल डोके, राहुल तुपे, औसफ़ हाश्मी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment