“इतिहास चांगला असो किंवा…” औरंगाबाद नामांतर निर्णयावर इम्तियाज जलील यांची शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका - latur saptrang

Breaking

Sunday, July 17, 2022

“इतिहास चांगला असो किंवा…” औरंगाबाद नामांतर निर्णयावर इम्तियाज जलील यांची शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका

 



“इतिहास चांगला असो किंवा…” औरंगाबाद नामांतर निर्णयावर इम्तियाज जलील यांची शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देऊन शिंदे गट-भाजपा सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाच्या फेरप्रस्तावाला आज मान्यता दिली. या प्रस्ताव मंजुरीनंतर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याची पुढची कायदेशीर प्रकिया सुरु केली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काही नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काही नेत्यांनी श्रेय लाटण्यासाठी हा निर्णय पुन्हा घेण्यात आला, अशी टीका केली आहे. दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील राज्य सरकारने घेतलेल्या नामांतराच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच इतर कागदपत्रांवरील माहिती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही पैसे देणार का? अस सवाल त्यांनी केला आहे.
“राजकीय स्वार्थ साधला गेला असेल, मनाला शांती मिळाली असेल तर औरंगाबाद शहराला पाणी कधी मिळणार हे सांगावे. ज्या शहराला महापुरुषाचे नाव दिले आहे, त्या शहराला दहा दिवसांतून एकदा पाणी मिळते. आमच्या युवकांना नोकऱ्या कधी मिळणार? इथे उद्योग कधी आणि किती येणार? आज युवकांना रोजगार महत्त्वाचा आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सात वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराला इंटरनॅशल इन्स्टीट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग देणार आहोत, अशी घोषणा केली होती. ते कधी देणार आहात?” असे प्रश्न जलील यांनी सत्ताधाऱ्यांना केले.
“औरंगाबाद शहरामध्ये उभारले जाणारे क्रीडा विद्यापीठ पुण्यात हलवण्यात आले. मोठी शिवसेना, छोटी शिवसेना तसेच भापजा हे सगळे त्यावेळी गप्पा बसले होते. त्यामुळे हे क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला कधी मिळणार हे सांगावे. नाव बदलून काय साध्य केले, हे आम्हाला येणाऱ्या काळात पाहायचे आहे,” अशी घणाघाती टीका जलील यांनी केली.
“आपण आज मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादी, मोठी शिवसेना, छोटी शिवसेना, काँग्रेस या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन नाचत आहेत. हे नाव बदलल्यानंतर आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड या सर्व कागदपत्रांमध्ये बदल करावा लागणार आहे. यासाठी आपण पैसे देणार आहात का? सामान्य नागरिकांना रांगेत उभे राहावे लागणार आहे का?” असा सवाल करत त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर टीका केली.
“शहराचे नाव बदलायचे असेल, तर त्या शहरातील लोकांची भावना काय आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. औरंगाबादचा काहीही संबंध नसणारे मुंबईत बसून निर्णय घेत आहेत. इतिहास चांगला असो किंवा वाईट तो पुसता येत नाही, असे म्हणत जलील यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध केला.

No comments:

Post a Comment