मुंबई, दि 24 : अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चिपळूण येथील वशिष्ठी नदीतील गाळ काढण्यात आला असून, आपत्कालीन परिस्थिती टाळण्यात आली आहे. चिपळूणच्या धर्तीवर राज्यातील सर्व नद्यांमधील गाळ काढणे, रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात धोरण आखण्यात येणार असून यासंदर्भातील कारवाई युद्ध पातळीवर करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विधानसभेत आज चिपळूण येथील वशिष्ठी नदीला आलेल्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासंदर्भात सदस्य सुनील राणे यांनी प्रश्न उपस्थित केला, यास उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, रवींद्र वायकर, अशोक चव्हाण, भास्कर जाधव, नितेश राणे, भरत गोगावले यांनी सहभाग घेतला होता.
मुख्यमंत्री म्हणाले, या वर्षी नदीतून गाळ काढण्याचे काम झाल्याने गत वर्षींच्या तुलनेत यावर्षी चिपळूणमध्ये पाणी शिरले नाही. भविष्यात पूरपरिस्थिती राज्यात कुठेही निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. चिपळूणच्या धर्तीवर राज्यातील सर्व नद्यांचे रूंदीकरण, खोलीकरण आणि गाळ काढण्याबाबत धोरण आखणार, याबाबत युद्धपातळीवर काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, जून महिन्यात वाशिष्ठ व शिवनदीतून एकूण ८.१० लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आला. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती हाताळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला कचरा व ढिगारे उचलणे, मदत छावण्या, शेतीपिके व मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्य प्रतिसाद निधीच्या दराने ५१ कोटी ८० लाख इतका निधी गाळ काढण्यासाठी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी १० कोटी २८ लाख ५६ हजार निधीप्राप्त झाला आहे. ५५ टक्के निधी खर्च करून नदीतील गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित काम लवकरच करण्यात येईल.
प्राप्त निधीतून नदीपात्रातील गाळ काढण्यासाठीचा टप्पा दोन आणि तीन लवकरच पूर्ण करणार. यासाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे मंत्री सत्तार यांनी विधानसभेत सांगितले.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/4O2BV8D
https://ift.tt/JfVRz8C
No comments:
Post a Comment