डिजिटल कारभाराद्वारे आम्हीही देऊ गावाच्या विकासात योगदान - latur saptrang

Breaking

Thursday, September 15, 2022

डिजिटल कारभाराद्वारे आम्हीही देऊ गावाच्या विकासात योगदान

मुंबई, दि. 15 (रानिआ) : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हीही गावाच्या विकासात योगदान देऊ शकतो आणि डिजिटल कारभारातही आम्ही मागे राहणार नाही. सरपंचासाठी असलेल्या डिजिटल सहीचा दक्षतापूर्व व प्रभावीपणे वापर करु, असा विश्वास राज्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणानंतर अनेक महिला सदस्यांनी व्यक्त केला.

विविध जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार ग्रामपंचायतीच्या जानेवारी 2021 मध्ये निवडणुका पार पडल्या. यात सुमारे 16 हजार महिला सदस्य निवडून आल्या होत्या. त्यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती व्हावी, या उद्देशाने ‘पंचायत कारभार परिचय’ प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. राज्य निवडणूक आयोग, इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन फॉर गुड गव्हर्नन्स, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट या संस्थांच्यावतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या बचत गटातील 80 महिलांची प्रारंभी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांना रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंटकडून प्रशिक्षण देण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुकास्तरावरील बचत गटांच्या फेडरेशनच्या (सीएमआरसी) माध्यमातून ग्रामपंचायत महिला सदस्यांशी गावपातळीवर समन्वय साधण्यात आला. त्यामाध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात आले. तांत्रिक सुविधांचा अभाव असलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. एकूण 500 तुकड्यांच्या माध्यमातून 16 हजार महिला सदस्यांना हे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.

प्रशिक्षणानंतर अनेक ग्रामपंचायत महिला सदस्यांनी प्रशिक्षणासंदर्भात उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “ग्रामपंचायतीचा कारभार, सभा – बैठका, ग्रामविकास समित्या, अर्थव्यवस्थापन, ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या, सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे कर्तव्ये इत्यादीसंदर्भातील सर्वंकष माहिती अत्यंत सोप्या भाषेत या प्रशिक्षणामुळे मिळू शकली,” असे जळगाव जिल्ह्यातील श्रीमती आशा जाधव यांनी सांगितले. “मी सरपंच असून माझ्या मनात डिजिटल सहीसंदर्भात काही प्रश्न होते. त्यांची अत्यंत सुलभपणे प्रशिक्षणात उत्तरे मिळाली. त्यामुळे मी आता लक्षपूर्वक आणि प्रभावीपणे डिजिटल सहीचा वापर करू शकेल,” अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील वैशाली पाटील यांनी व्यक्त केली.

“पंचायत कारभार परिचय प्रशिक्षणामुळे ग्रामपंचायत महिला सदस्य अधिक प्रभावीपणे काम करू  शकतील व ग्रामविकासात मोलाची भूमिका बजावू शकतील. त्यांच्यातील नेतृत्व गुणांना अधिक  प्रोत्साहन मिळेल. त्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा,” अशा शब्दांत राज्य निवडणूक  आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी प्रशिक्षणाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

-0-0-0-

(Jagdish More, SEC)



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/gLTNEtD
https://ift.tt/yfSros7

No comments:

Post a Comment