‘किशोर’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन - latur saptrang

Breaking

Tuesday, October 4, 2022

‘किशोर’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 4 : बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे आदी उपस्थित होते.

गेली पन्नास वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केले जाते. यंदाचा ‘किशोर’चा अंक बाल आणि किशोर या दोन्ही गटांतील मुलांसाठी रंजक, बोधप्रद आणि संस्कारक्षम असून मुलांच्या आकलनशक्तीचा अंदाज घेऊन अंकातील विषय आणि भाषाशैली निवडण्यात आली आहे.

ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन यांनी या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ चितारले आहे. ज्येष्ठ गीतकार आणि कवी गुलजार, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अनिल अवचट, महावीर जोंधळे, श्रीकांत बोजेवार, राजीव तांबे, प्रवीण दवणे, विजय पाडळकर, रेणू गावस्कर, वंदना भागवत, दासू वैद्य, संजय भास्कर जोशी आदींचा लेखन सहभाग या अंकात आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/N46rVxH
https://ift.tt/NEVa8nf

No comments:

Post a Comment