मुसळधार पावसाने बळीराजा हतबल; नुकसानीची पाहणी करणास या, धनंजय मुंडेंची साद - latur saptrang

Breaking

Monday, October 17, 2022

मुसळधार पावसाने बळीराजा हतबल; नुकसानीची पाहणी करणास या, धनंजय मुंडेंची साद

 



मुसळधार पावसाने बळीराजा हतबल; नुकसानीची पाहणी करणास या, धनंजय मुंडेंची साद


बीड : मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सात दिवसांत १०२ मिलिमीटर सात पाऊस सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस यांसह तूर, मूग, उडीद आदी खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील पावसाने निर्माण केलेल्या या विदारक दृश्याची पाहणी करायला या, असे आवाहन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

सोयाबीनचे खळे सुरू असताना आलेल्या तुफान पावसामुळे एक शेतकरी कुटुंब पाण्यात भिजणारे सोयाबीन गोळा करून टोपलीत भरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हाच व्हिडिओ धनंजय मुंडे यांनीदेखील आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला आहे. ‘पाण्यात वाहणारी सोयाबीन गोळा करताना व काळ्या पडलेल्या कापसाच्या एकेका झुडपाकडे पुन्हा पुन्हा वळून बघणाऱ्या बळीराजाला पाहून नक्कीच तुमच्याही पोटात गोळा येईल;’ असे मुंडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना उद्देशून म्हटले आहे. बळीराजा म्हणवल्या जाणाऱ्या अन्नदात्याच्या पाठीचा कणा नैसर्गिक संकटाने मोडून पडला असून, या शेतकऱ्यांना सरकारने आधार व मदत देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जून ते ऑगस्ट दरम्यान पावसामुळे नुकसान झाले. परंतु अतिवृष्टीच्या निकषात बसत नाही अशा शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीपोटी राज्यातील नऊ जिल्ह्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १७ लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. ही अल्पमदत म्हणजे सरकारने बीडमधील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका मुंडे यांनी केली. त्याचबरोबर राज्य सरकारने अतिवृष्टीबाधित क्षेत्राला मदत करतानाही बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस त्या निकषात बसत नसल्याचे सांगून जिल्ह्याला मदतीतून वगळले होते. त्याचीही आठवण मुंडे यांनी करून दिली; तसेच ‘आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यातील नुकसान बघण्यासाठी प्रत्यक्ष यावे,’ असे आवाहन केले 

No comments:

Post a Comment