मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून तोडगा काढणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - latur saptrang

Breaking

Sunday, October 23, 2022

मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून तोडगा काढणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.२२ : कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावणाऱ्या 263 कुटुंबासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवाळी साजरी केली. या कुटुंबाला एक महिना पुरेल इतके धान्य किट, दिवाळीचा फराळ व भाऊबीजेची रक्कम एका भावपूर्ण कार्यक्रमात त्यांनी अर्पण केली.

नागपूर जिल्ह्यातील झिल्पी तालुका हिंगणा येथील श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्यावतीने कोरोनाग्रस्तांसाठी ‘सोबत पालकत्व प्रकल्प’ राबविला जात आहे. नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी या संस्थेचे प्रमुख आहेत. या संस्थेने नागपूर जिल्ह्यातील 263 कुटुंबांचे पालकत्व घेतले आहे. या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सामाजिक ऋणातून या संस्थेने कुटुंबाचे शिक्षण आरोग्यापासून सर्व दायित्व घेतले आहे.

या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा एक संवेदनशील कार्यक्रम संदीप जोशी यांनी आज येथील जेरील लॉन येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार प्रवीण दटके, संस्थेचे अध्यक्ष संदीप जोशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये व २६३ कटुंबातील सदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात पाच महिलांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी या सर्व कुटुंबाशी त्यांनी संवाद साधला. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टने अतिशय विदारक परिस्थितीमध्ये ज्यावेळी शासनाकडून मदतीची घोषणा व्हायची होती त्या सुरुवातीच्या काळात संवेदनशीलतेने या कामाला सुरुवात केल्याची आठवण त्यांनी करून दिली. या संस्थेने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कोविड विधवा महिला व त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केली आहे.

संदीप जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मुलांच्या खाजगी शाळांमधील प्रवेश शुल्काबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता. त्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) तसेच काही देणगी मिळवून हा प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले.

राज्यामध्ये आनंदाचा शिधा देताना देखील हीच भावना शासनाने ठेवली आहे. शासन कोरोनाग्रस्त तसेच अतिवृष्टीमुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. त्यांना मदत करण्याची आनंदाच्या शिधा वाटप मागील भावना असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळातील दोन वर्षानंतर दिवाळी साजरी करताना ज्यांच्या घरात या आजारामुळे कायमचे दुःख आले आहेत. त्या समाजाला बाजूला ठेवू नका. त्यांच्यासह दिवाळी साजरी करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

तत्पूर्वी संस्थेचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. सरकारी यंत्रणे सोबतच समांतर अशी यंत्रणा उभारून कोरोना पीडिताना मदत करण्याचा प्रयत्न या संस्थेमार्फत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 263 कुटुंबांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी ‘हेल्थ कार्ड ‘ यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार प्रवीण दटके यांनी या संस्थेने अतिशय विदारक परिस्थितीमध्ये सुरू केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. समाजातील दातृत्व दानत आणि गरज असताना मदत करण्याचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत रत्नखंडीवार यांनी केले.

*******



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/MmOEKHx
https://ift.tt/bzfuo6x

No comments:

Post a Comment