⚖️ 'धनुष्यबाणा'चा निर्णय लांबणीवर :
शिवसेनेचे धनुष्याबाण चिन्ह शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे, याबाबतचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आज येणारा निर्णय लांबणीवर पडल्याचे वृत्त आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आज होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, आज ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार आहे.
🗣️ चंद्रकांत पाटलांच्या नव्या वक्तव्याने चर्चेचा एकच धुरळा :
चंद्रकांत पाटलांनी आपल्याला संपवल्यांची भाषा केलीय, अशी खंत राजू शेट्टी यांनी एका केंद्रीय नेत्यापुढे केली होती. ते पुढे म्हणाले होते की, तुम्ही चंद्रकांत पाटलांना आई -वडिलांवरून शिव्या द्या त्यांना काही वाटणार नाही. मात्र, मोदी आणि शहांना काही बोलल्याचे त्यांना चालणार नाही. हा किस्सा पुण्यातील सत्कार समारंभात स्वतः मंत्री चंद्रकांत पाटीलांनी सांगितला. पाटलांनी एकप्रकारे तुम्ही आई-वडिलांना शिवा द्या, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही बोलू नका, असा इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे.
🚨 NCB कडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश :
मुंबईमध्ये नार्कोटिक कंट्रोल ब्युरोला मोठं यश आलं आहे. एनसीबीने एका आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला असून सहा जणांना अटक केली, ज्यामध्ये म्होरक्या आणि त्याच्या साथीदाराचाही समावेश आहे. सोबतच मुंबईतील गोदामातून 50 किलो मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याआधी गुजरातमधून 10 किलो मेफेड्रोन जप्त केलं होतं. जप्त केलेल्या एकूण 60 किलो ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 120 कोटी रुपये इतकी आहे.
⚡ 'आदिपुरुष'ला भाजपचा विरोध, मनसेचा पाठिंबा :
भाजपने 'आदिपुरुष' या सिनेमाला विरोध दर्शवत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. पण आता या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक पत्र जाहीर केलं आहे. ओम राऊत यांच्याकडून अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे.
💫 दिग्दर्शक प्रवीण तरडेचं फेसबुक अकाऊंट हॅक :
दिग्दर्शक प्रवीण तरडेचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. त्यांनी इंस्टाग्रामवरुन यासंदर्भात माहिती दिली. माझ्या फेबसबुकवरून मेसेज आल्यास त्याला रिप्लाय करू नका असं आवाहनही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. एका पाठोपाठ एक हिट सिनेमांमुळे प्रवीण यांचा सोशल मीडियावरील वावर प्रचंड वाढला आहे.
No comments:
Post a Comment