महात्मा गांधींना दिलेल्या वचनापोटी वल्लभभाई पटेलांनी शेवटपर्यंत नेहरूंची साथ सोडली नाही : अरुण करमरकर - latur saptrang

Breaking

Friday, October 7, 2022

महात्मा गांधींना दिलेल्या वचनापोटी वल्लभभाई पटेलांनी शेवटपर्यंत नेहरूंची साथ सोडली नाही : अरुण करमरकर


arun


 महात्मा गांधींना दिलेल्या वचनापोटी वल्लभभाई पटेलांनी 

शेवटपर्यंत नेहरूंची साथ सोडली नाही : अरुण करमरकर 
लातूर : भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना दिलेल्या वचनामुळे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची साथ सोडली नव्हती,  प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले. 
                      लातूर येथील  पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शारदोत्सव व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प करमरकर यांनी ' वल्लभभाई पटेल : सामर्थ्यवान नेता, सच्चा अनुयायी या विषयावर गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्याख्यानमालेचे यावर्षीचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी हे होते. व्यासपीठावर प्रायोजक प्रतिनिधी बुलढाणा अर्बनचे मारोती घोणसे, आयसीआयसीआय बँकेचे गजानन काटीकर , व्याख्यानमालेचे सचिव प्रकाश घादगिने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  आपल्या वक्तृत्वाने अरुण करमरकर यांनी उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी प्रेक्षकांच्या समोर अगदी सजीवपणे प्रस्तुत केले. पटेल यांच्यामध्ये अगदी बालपणापासूनच देशप्रेम, राष्ट्रप्रेमाची भावना ओतप्रोत भरलेली होती, असे सांगून अरुण करमरकर म्हणाले की, वल्लभभाई पटेल खरोखरच एक सामर्थ्यवान नेता आणि  सच्चे अनुयायी होते याची प्रचिती त्यांच्या एकंदर कार्यपध्दतीकडे पाहिल्यास लक्षात येते.  शालेय जीवनापासूनच त्यांच्यात नेतृत्वगुण  उतरले होते. एक यशस्वी राष्ट्रीय नेता होण्याआधी त्यांनी गुजरातमध्ये वकिली व्यवसायही केला. ते एका खूनाचा  खटला चालवत होते. शेवटचा युक्तिवाद चालू असताना पटेलांच्या सहकाऱ्याने  त्यांच्या पत्नीचे कर्करोगाच्या उपचारादरम्यान निधन झाल्याचा निरोप दिला. तरीही पटेलांनी आपला युक्तिवाद पूर्ण करून आपल्या आशिलाला जीवनदान देऊनच  ते स्वस्थ बसले. यावरून आपल्या कर्तव्याविषयीची त्यांची आस्था सर्वांच्या निदर्शनास येते. ते ज्या ज्या क्षेत्रात उतरले, तेथे त्यांनी कायम अव्वल स्थान संपादन  करताना करमरकर यांनी अनेक उदाहरणे प्रस्तुत केली. 
                              वल्लभभाई पटेल यांनी आपल्या आयुष्यात महात्मा गांधींचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १९४६ साली १४ पैकी १२ प्रांतांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना  अध्यक्षपदासाठी प्रथम पसंती दिली होती. एकाही  प्रांताकडून जवाहरलाल नेहरू यांचे नाव सुचविण्यात आलेले नसतानाही त्यांनी केळवा गांधीजींच्या एका शब्दावर अध्यक्षपदापासून माघार घेऊन नेहरूंचे नाव सुचवले होते, हा इतिहास आहे. राजकारणात वावरताना सच्चा अनुयायी कसा असावा तर तो पटेल यांच्यासारखा असावा,अशी त्यांनी आपली ओळख निर्माण करून ठेवल्याचेही करमरकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमुख अशोक गोविंदपूरकर यांनी केले. सूत्रसंचालन अब्दुल गालिब शेख यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश घादगिने यांनी केले. 

No comments:

Post a Comment