मुंबई: 'शेतकऱ्यांना चिरडणं, शेतकऱ्यांच्या विरोधात कारवाई करणं, शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलणाऱ्यांचा गळा दाबणं ही भाजपची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत धोरण आहे का?,' असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली आहे. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यानं संतापात भर पडली आहे. देशभरातून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर तोफ डागली आहे. 'भाजप सरकारची ही नेहमीची स्ट्रॅटेजी झाली आहे. हाथरससारखे बलात्कार कांड असो किंवा शेतकऱ्यांवर होणारे हल्ले असो. लोकशाहीत एक नवा पायंडा मोदी सरकारनं पाडलाय. विरोधी पक्षाचे नेते लोकांच्या संतापाला वाचा फोडत असतील तर कायदा सुव्यवस्थेच्या नावावर त्यांचा आवाज दाबण्याचं एक नवं हत्यार सरकारनं शोधून काढलंय. सत्य समोर येऊ दिलं जात नाही. लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळं देशातील शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप आहे. त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला तर संतापाचा स्फोट होऊ शकतो. काय चाललंय हे लोकांना चांगलं कळतंय. उत्तर प्रदेशातील स्थिती भयंकर आहे. प्रियांका गांधींसह अनेक नेत्यांना रोखलं गेलंय. पंतप्रधान मोदी हे आपल्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल बरंच काही बोलत असतात. त्याच भारतीय जनता पक्षाचे लोक शेतकऱ्यांच्या अंगावर बेफामपणे गाड्या घालताहेत. अशी कृत्ये ब्रिटिश राज्यांमध्ये होत होती. मोदी सरकारचं हे अधिकृत धोरण आहे का? हे एकदा त्यांनी जाहीर करावं,' असं संजय राऊत म्हणाले.
No comments:
Post a Comment