अहमदनगर :करोना संसर्ग वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांत पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणाही कामाला लावण्यात आली आहे. अशावेळी प्रशासासोबतच गावकऱ्यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली असून बहुतांश गावात कडकडकीत बंद पाळण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दहापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या गावांत चार ते १३ ऑक्टोबर या काळात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी हा आदेश दिला. त्यानंतर आज सोमवारी पहिल्याच दिवशी बहुतांश गावांतील व्यवहार पूर्णपणे बंद असल्याचे आढळून आले. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. किराणा दुकाने सकाळी ८ ते ११ यावेळेत सुरू होती. गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यास आणि बाहेरच्या लोकांना या गावात येण्यास बंदी आहे. यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी अडथळे उभारले आहेत. तेथे पोलीस बंदोबस्त असून काही ठिकाणी गावातील करोना नियंत्रण समितीचीही मदत घेण्यात येत आहे. ऐन सणासुदीत कडक लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ तेथील ग्रामस्थांवर आली आहे. सध्या तरी ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या गावांत संशयितांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या असून प्राधान्याने लसीकरण हाती घेण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment