केंद्र सरकारच्या भुमिकेचा निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुंडन आंदोलन - latur saptrang

Breaking

Sunday, October 3, 2021

केंद्र सरकारच्या भुमिकेचा निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुंडन आंदोलन



 औसा/प्रतिनिधी: सोयाबीनसाठी सरकारने जाहीर केलेली आधारभूत किंमत अत्यंत कमी असून एफआरपी संदर्भात घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन रयत परिषदेच्या वतीने शनिवारी मुंडन आंदोलन करण्यात आले.

यावेळी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले.
  कृषि विद्यापीठाने सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च ५ हजार रुपये असल्याचे म्हटलेले आहे.असे असतानाही सरकारने ४ हजार रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे.शिवाय सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्याने ११ हजार रुपयांवर गेलेले सोयाबीनचे भाव कोसळले.एफआरपी संदर्भातही असाच निर्णय घेण्यात आला आहे.तीन टप्प्यात एफआरपीचा निर्णय अन्यायकारक आहे.
  सरकारच्या या चुकीच्या धोरणांचा निषेध म्हणून गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटना व बहुजन रयत परिषदेच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले.संघटनेच्या ६३ पदाधिकाऱ्यांनी मुंडन करून घेत सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.औसा तहसीलरांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनही पाठवण्यात आले.
  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे व बहुजन रयत परिषदेचे महासचिव राजीव कसबे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात रुपेश शंके,दगडू बरडे,अजिंक्य शिंदे,सचिन ढवण,केवळबाई लकडे,नारायण नरखेडकर,गौतम कांबळे,बालाजी जाधव,विवेक पाटील,गंगाधर वाघमारे यांच्यासह असंखय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

 आज जतन केलेला निसर्ग उद्या दर्जेदार जीवनाची हमी आहे -केदार खमितकर
 श्री छत्रपती शाहू मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी

No comments:

Post a Comment