मुंबई, दि.31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे एका रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, एडीसी विशाल आनंद यांसह कर्मचारी व अधिकारी यांनी रक्तदान केले. शिबिराचे आयोजन राजभवन तसेच सर ज. जी. समूह रुग्णालयातर्फे करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यपालांनी उभयतांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
स्वातंत्र्याच्या वेळी विविध संस्थानांमध्ये विभाजित असलेला भारत कधीही एकसंध होऊ शकणार नाही असे विपरीत अंदाज काही ब्रिटिश नेत्यांनी वर्तविले होते. मात्र सरदार पटेल यांनी दृढ संकल्पाच्या बळावर विविध संस्थानांचे विलिनीकरण करून भारताला एकत्र केले. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आज काश्मीरसह सर्व देश एक झाला आहे, असे राज्यपालांनी सांगितले. राष्ट्रीय एकतेसाठी इंदिरा गांधी यांनी केलेल्या योगदानाचा देखील राज्यपालांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
***
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3jTzKHh
https://ift.tt/3vZXXkf
No comments:
Post a Comment