राज्य महिला आयोगाच्या अध्यपदावरून चित्रा वाघ- रुपाली चाकणकर वादावर मी रुपाली चाकणकर यांना कधीही शुर्पणखा म्हटलेले नाही. मी केलेल्या ट्विटमध्ये त्यांचे नाव घेतलेले नाही, असा खुलासा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
चित्रा वाघ म्हणाल्या की , मी केलेल्या ट्विटमध्ये इतकंच म्हटले आहे की, या पदावर जे कोणी येईल त्यांनी राजकारणातील रावणांना साथ देऊ नये. मी कुठेही रुपाली चाकणकरांना शुर्पणखा म्हटलेले नाही. राजकीय क्षेत्रात, सत्ताधारी पक्षातील आमदार, नेते, बगलबच्चे यांच्या रावणरुपी लोकांना या पदावर येणाऱ्या महिलेने वाचवू नये, अशी माझी अपेक्षा आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर येणारी महिला आत्मसन्मानाची रक्षण करणारी असावी. मुळात राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. महिला आयोगाला अध्यक्ष द्या, अशी मागणी मी केलीय. राजकारणातील रावणांना साथ शुर्पणखा नको, असे मी म्हटले आहे. त्याचा संदर्भ तुम्ही (पत्रकारांनी) चाकणकरांशी का लावता, असा प्रतिसवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादीच्या खासदार विद्या चव्हाण यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, एका मुलीला न्याय देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी मी चर्चा करून एक प्रकरण हाताळले होते. मात्र, त्या मुलीला घरी कामासाठी ठेवल्याचा आरोप करणाऱ्या चव्हाण यांचे डाेक्यावर कौटुंबीक कलहामुळे मानसिक संतुलन ढासळले आहे.
मी वैयक्तिक टीका खपवून घेते; पण कामावर प्रश्न उपस्थित कराल तर खपवून घेणार नाही. तुम्हाला काही गोष्टी माहीत नाहीत त्यामुळे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चव्हाण यांना समज दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 14, 2021
अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका
अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल
No comments:
Post a Comment