डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना : ११ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - latur saptrang

Breaking

Monday, January 31, 2022

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना : ११ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई, दि. ३१: डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत मदरसांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित,  समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता ९वी ते १२वी तील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्याचा उद्देश या योजनेचा आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयांसाठी अनुदान आणि शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देखील डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून दिले जाते.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांकरिता लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना आणि अधिक तपशील महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी केलेल्या आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या मदरसांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ यांच्याकडे ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले प्रस्ताव शासनास २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर केले जाणार आहेत.

०००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/GxEcg12uh
https://ift.tt/KMwdm4615

No comments:

Post a Comment